आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सेतू’मध्ये जीएसटीच्या नावे लूट, 40 रुपयांच्या कामासाठी एजंटाने उकळले तब्बल 400 रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो.
औरंगाबाद- उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी ३३ रुपये ६० पैसे शुल्काची पावती दिली जाते. मात्र, जीएसटीमुळे ३५ रुपये शुल्क आकारत आहोत, असे म्हणत सेतू सुविधा केंद्रात दाखल्यासाठी दीड रुपयाची लूट केली जात आहे. भाजपच्या जिल्हा महिला व्यापारी आघाडीच्या वर्षा साळुंखे यांनी ३५ रुपयांची पावती द्या, अन्यथा ३४ रुपयांत काम करा, असा आवाज उठवताच सोमवारी रांगेतील सर्वांना ३४ रुपयांत दाखला देण्यात आला. इतकेच नाही तर अवघ्या ४० रुपयांत होणाऱ्या या कामासाठी एजंट ४०० रुपये आकारून लूट करत असल्याचेही उघड झाले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी दिवसभर रांगा लागलेल्या आहेत. पाच मिनिटांच्या कामासाठी पाच तास थांबण्याची वेळ पालक आणि विद्यार्थ्यांवर येत आहे. सोमवारी दुपारी वाजेच्या सुमारास वर्षा सोळुंके मुलाच्या इंजिनिअरिंग प्रवेशासाठी हवा असलेला उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी सेतू कार्यालयात आल्या. ३३.६० रुपये शुल्काची पावती देत असूनही अमोल हा कर्मचारी ३५ रुपये शुल्काची मागणी करत होता. वर्षा यांनी जास्तीचे पैसे कशाचे विचारताच जीएसटीचे आहेत, असे सांगण्यात आले. ठीक आहे, आम्ही ३५ रुपये देतो, तशी पावती द्या म्हणताच कर्मचारी बॅकफूटवर आला आणि ३४ रुपये द्या म्हणू लागला.

या प्रकारामुळे रांगेतील सर्वच लोक जागरूक झाले. त्यामुळे रांगेतील सर्वांकडून ३५ ऐवजी ३४ रुपये कर्मचाऱ्याने घेतले. सोळुंके म्हणाल्या, उत्पन्नाचा दाखला शाळा सोडण्याचा दाखला जोडल्याशिवाय इंजिनिअरिंग प्रवेशाचे किट मिळत नाही. मी कर्मचाऱ्याला जाब विचारल्यावर त्याने जीएसटीचे कारण पुढे केले. पावती मागितल्यावर तो सरळ झाला. संधी साधून अडवणूक प्रवेशाच्या तारखा निश्चित आहेत. त्यामुळे वेळेत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. नेमका याच संधीचा फायदा हे लोक घेत आहेत, असे या ठिकाणी असलेले अब्दुल रहिम पठाण आणि हनीफ कुरेशी यांनी सांगितले.
 
एजंटनी घेतले ४०० रुपये
अर्जशुल्काची रक्कम मिळून ४० रुपये खर्च या प्रमाणपत्रासाठी येत असताना ४०० रुपये उकळले जात असल्याचा प्रकार आमच्यासमक्ष घडला. आम्ही मदत केल्यावर त्या माणसाचे काम ४० रुपयांत मार्गी लागले, असे सोळुंके म्हणाल्या.
 
बातम्या आणखी आहेत...