आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्‍ये पाऊस घेऊन आले बाप्पा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गणरायाच्या आगमनासोबतच सोमवारी रात्री साडेदहा ते अकरादरम्यान अर्धा तास 26.4 मिमी पाऊस पडला. महिनाभरापासून दडी मारलेला पाऊस विजांच्या कडकडाटासह मुसळधार बरसल्याने खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले असून रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, तर अचानक आलेल्या मुसळधार पावसाने गणेश मंडळे, बाजारपेठेची दाणादाण उडवली.

यंदा मान्सून सुरू झाल्यापासून भिजपाऊस पडत आहे. मृग, आद्र्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा या सर्व नक्षत्रांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मुसळधार पाऊस झाला नाही. सूर्य चांगलाच तळपू लागल्याने खरिपातील ऐन भरात आलेली पिके सुकण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. सोमवारी पडलेल्या पूर्वा नक्षत्रातील पावसाने सर्वांना दिलासा मिळाला. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पावसाने मंडप, डेकोरेशन, मूर्ती, पताका आदी सजावटीचे साहित्य ओले झाले. सांस्कृतिक कार्यक्रम मध्येच बंद करावे लागले. र्शींच्या दर्शनाला बाहेर पडलेल्या भाविकांची एकच धांदल उडाली. पुढील आठ ते दहा दिवसांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे.


पैठण, सोयगाव, सिल्लोड परिसरात मुसळधार
औरंगाबाद । जिल्ह्यात सोयगाव, पैठण, बिडकीन, सिल्लोड, उंडणगाव, गंगापूर येथे पावसाने सोमवारी गणरायाच्या आगमनासोबत दमदार हजेरी लावली. पैठण तालुक्यातील बिडकीन , विहामांडवा, पाचोड परिसरात सोमवारी रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी सुरूच होत्या. गंगापूर तालुक्यात सायंकाळी चार वाजता सुमारे तासभर जोरदार पाऊस पडला. सोयगाव, सिल्लोड तालुक्यातही संततधार सुरू होती. औरंगाबाद शहर व परिसरात अनेक गावांना रात्री पावसाने झोडपले. खुलताबाद, फुलंब्री, कन्नड, वैजापूर तालुक्यात मात्र पावसाची नोंद झाली नव्हती.


नाशिक शहरात पाऊस
नाशिक शहरातही दुपारी एक वाजेनंतर सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. शहरातील नाशिकरोड, पंचवटी, गंगापूर रोड, कॉलेज रोडवर पाऊस पडला.
मराठवाड्यात सर्वदूर बरसात
मराठवाड्यातील नांदेड, बीड, जालना, हिंगोली, उस्मानाबाद, परळी, गेवराईत जोरदार पाऊस झाला.