आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुठ्ठ्यावर साकारल्या श्रीगणेशाच्या नानाविध १०८ प्रतिमा, लिम्का बुक, युनिक वर्ल्डमध्येही नोंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - व्यक्तिचित्र,निसर्गचित्र, सामाजिक संदेश देणाऱ्या आणि ऐतिहासिक प्रसंगावर आधारित अनेक रांगोळ्या आजवर अनेकांनी काढल्या आहेत. मात्र पुठ्ठ्यावर १०८ श्रीगणेश प्रतिमा काढण्याचा अनोखा विक्रम शहरातील जान्हवी जोशी यांनी केला. या प्रयोगाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे.

मूळ नागपूरच्या असणाऱ्या जान्हवी या पती जयंत यांच्या नोकरीनिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादेत वास्तव्याला आहेत. रांगोळी हा त्यांचा छंद आणि आवडीचा विषय. याच आवडीमुळे त्या रांगोळीच्या माध्यमातून सातत्याने नवनवे प्रयोग करत असतात. २०१५ मध्ये महाराष्ट्र दिनामनिमित्त शहरातील प्रोझोन मॉल इथं ३५ बाय ३५ आकाराची संस्कारभारतीची रांगोळीही त्यांनी काढली होती. याच अंतर्गत नुकताच त्यांनी रांगोळीच्या माध्यमातून सेवाभाव व्यक्त करण्याच्या उद्देशाने ५० बाय ५० से.मी. आकाराच्या पुठ्ठ्यावर रांगोळीच्या माध्यमातून १०८ श्रीगणेश प्रतिमा काढण्याचा अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. गृहिणी असणाऱ्या जान्हवी यांनी यासाठी सलग सात दिवस एकाग्रतेने मेहनत घेतली. जवळपास ७३ तासांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी साकारलेल्या श्रीगणेश प्रतिमांचे प्रदर्शन शहरातील गजानन महाराज मंदिरात, प्रकट दिनानिमित्त भरवण्यात आले होते. लिमका बुक ऑफ रेकॉर्डसने नुकतीच याची नोंद घेऊन संमती देण्यात आली आहे. याशिवाय युनिक वर्ल्ड रेकॉर्डमध्येही जान्हवी यांच्या प्रयोगाची नोंद करण्यात आली आहे.

कुटुंबीयांची मिळाली मदत
छोट्याआकारातील १०८ श्रीगणेश प्रतिमा एकाच वेळी रांगोळीतून चितारण्याचे अनेक दिवसांपासून मनात होते. मात्र त्यासाठी जागेची अडचण हा मोठा भाग होता. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता-आणता येईल या पद्धतीनं या प्रतिमा कशा साकारता येतील यावर खूप विचार केल्याचे, जान्हवी सांगतात. त्यानंतर आम्ही अनेक पर्याय पडताळून बघितले. शेवटी पुठ्ठ्यावर रांगोळी काढायचं पक्के केले. शिवाय घरचे सगळे सांभाळून मला हे करता येण्यासारखे होते, असे जान्हवी यांनी सांगितले. पती आणि कुटुंबातील इतर सदस्यांची याकामी मोलाची मदत झाल्याचे, त्या नमूद करतात.

प्रदर्शन भरवणार : येत्या आठ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त जान्हवी यांच्या विक्रम प्रस्थापित करणाऱ्या या श्रीगणेश प्रतिमांचे प्रदर्शन, शहरातील कलश मंगल कार्यालयात भरवण्यात येणार आहे.