आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार साखर कारखान्यांना 15 दिवसांतच 11 कोटींचा तोटा; पारंपरिक वाणांमुळे उताऱ्यात घट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाड- औरंगाबाद जिल्ह्यातील ऊस गाळप करीत असलेल्या चार साखर कारखान्यांना  मिळत असलेला साखर उतारा आणि आंदोलनकर्त्यांची उसाला एफआरपीपेक्षा अधिक भाव देण्याची मागणी अशीच पुढे कायम राहिल्यास येत्या काही वर्षात मराठवाड्यातील साखर उद्योग मोडीत निघेल, अशी भीती साखर उद्योगातून व्यक्त होत आहे. कारण संपूर्ण मराठवाड्याची स्थिती औरंगाबाद जिल्ह्यासारखीच आहे. पैठणचा संत एकनाथ चार दिवसांपूर्वीच तर तीन साखर कारखाने १५ दिवसांपूर्वी सुरू झाले आहेत.  केवळ १५ दिवस चालणाऱ्या या चार साखर कारखान्यांना अंदाजे ११ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचा दावा चारही कारखान्यांनी दिव्य मराठी’शी बोलताना केला आहे.  


औरंगाबाद जिल्ह्यातील छत्रपती संभाजी राजे, मुक्तेश्वर शुगर मिल, बारामती अॅग्रो शुगर या तीन कारखान्यांनी पंधरा तर संत एकनाथ अतुल शुगरने चार दिवसांपूर्वी ऊस गाळपास प्रारंभ केला आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत या कारखान्यांनी १ लाख २९ हजार ३५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यातून या साखर कारखान्यांना ८२ हजार २४५ क्विंटल साखर पोती मिळाली आहे. या चारही कारखान्यांचा साखर उतारा सरासरी ७.३४ टक्के आहे. म्हणजेच एक टन उसातून साखर कारखान्यांना गुरुवारपर्यंत सरासरी ७३ किलो ४०० ग्रॅम साखर मिळालेली आहे. कमीत कमी ९.५० टक्के साखर उतारा असणाऱ्या उसाला २५५० रुपये प्रतिटन भाव देणे साखर कारखान्यांना बंधनकारक आहे. परंतु आजचा साखर उतारा केवळ ७.३४ टक्केच आहे.   केंद्राच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील चारही साखर कारखान्यांना गुरुवारपर्यंत (दि.१६) गाळप केलेल्या उसास प्रतिटन २५५० भावाप्रमाणे ३२ कोटी ९० लाख ३९ हजार २५० रुपये देणे बंधनकारक अाहे.  एक टन गाळपासाठी कमीत कमी १३०० रुपये उत्पादन खर्च लागतो. म्हणजे केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे ऊस दर २५५० अधिक उत्पादन खर्च १३०० रुपये असे एकूण ३८५० रुपये कुठल्याही परिस्थितीत खर्च आहेच.  म्हणजेच या चारही साखर कारखान्यांच्या माथी गुरुवारपर्यंत (दि.१६) ४९ कोटी ६७ लाख ८४ हजार ७५० रुपये खर्च पडला आहे.  एक टनाचा खर्च ३८५० आणि साखरेतून मिळणारे (७.३४उता-यानुसार) २९९१ रुपये याची गोळा बेरीज केल्यास जिल्ह्यातील  चारही साखर कारखान्यांना टनामागे  ८५९ रुपये ताेटा सहन करावा लागत आहे. चारही साखर कारखान्यांनी १ लाख २९ हजार ३५ मे.टनाचे गाळप केले असून हे कारखाने आजपर्यंत ११ कोटी ८ लाख ४१ हजार ६५ रुपये तोटा सहन करीत आहेत. 


पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्याच्या उलटे गणित आहे. कारण सातारा,सांगली आणि कोल्हापुर या जिल्ह्यातून एक टन उसामागे सरासरी एक क्विंटल अकरा किलो पाचशे ग्रॅम साखर मिळत आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील साखर उताऱ्यातही वाढ होईल. परंतु तोपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याचा उतारा प्रतिटन सरासरी १३ टक्के होणार आहे. याचे कारण पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी १०००१, ८००५ या नवीन ऊस वाणाचा स्वीकार केला आहे. या उसाचा उतारा ९.५० टक्क्यांवरच  मिळतो. मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकरी २६५ जातीचे जुने उसाचे वाण सोडायला तयार नाही. 


या वाणाचा ऊस १५ ते १६ महिन्यांचा झाल्यावरच १० टक्क्यांपर्यंत  उतारा मिळतो. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांना मिळणारा भाव मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळावा, ही प्रमुख मागणी असली तरी मराठवाड्यातील उत्पादकांनीही वाणाचा बदल करणे गरजेचे आहे. नसता कापड गिरण्यांच्या आंदोलनासारखीच मराठवाडयातील साखर उद्योगाची अवस्था होईल, अशी भीती साखर कारखानदार व्यक्त करू लागले आहेत.  

 

पुढील स्‍लाईडवर पाहा, साखर उद्योग मोडीत निघण्याची भीती...

बातम्या आणखी आहेत...