आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Love Couple Suicide At Aurangabad For Valentine Day

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

 ‘व्हॅलेंटाइन’च्या पूर्वसंध्येला औरंगाबादेत प्रेमीयुगुलाची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अरिहंतनगरातील (जवाहर कॉलनी) प्रेमीयुगुलाने ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पूर्वसंध्येला एकाच दोरीने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघे नात्याने सख्खे मावसबहीण-भाऊ होते. त्यामुळे लग्न अशक्य असल्याने त्यांनी जीवनयात्रा संपवली असावी, अशी शक्यता पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर वर्तवली आहे. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यानंतर युगुलाच्या नातेवाइकांनी अरिहंतनगरात गर्दी केली होती. ममता शांतीलाल राजपूत (17, रा. अरिहंतनगर) आणि चंदन राजूसिंग राजपूत (21, रा. नाथनगर, मूळ अहमदनगर) अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयटी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचा डिप्लोमा करणारी ममता आणि अहमदनगर येथील रायसोनी महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणारा चंदन या दोघांमध्ये काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. ममताच्या वडिलांचे खोकडपुर्‍यात किराणा दुकान असून, चंदनच्या वडिलांचे सात वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. चंदनचा लहान भाऊ चेतन हादेखील एमआयटी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेतो. तो सिंधी कॉलनीच्या पाठीमागे असलेल्या नाथनगरात राहायला आहे. परीक्षा असल्याने चंदनला मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास चेतनने पुण्याच्या बसमध्ये बसवून दिले होते. सायंकाळी अहमदनगरला पोहोचल्यानंतर चंदनने चेतनशी संपर्क साधला. पुण्याकडे निघाल्याचेही त्याने त्या वेळी सांगितले होते.

अशी उघड झाली घटना
नातेवाइकांकडे लग्न असल्याने चंदनची आई, ममताची आई मंगल आणि वडील शांतीलाल एकत्र बोरगाव पिंप्री गावी गेले होते. ममता अभ्यासाचे कारण सांगून त्यांच्यासोबत गेली नाही. दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान ती महाविद्यालयातून घरी आली. यानंतर चारच्या सुमारास तिची एक मैत्रीण तिला भेटण्यासाठी आली. घराचा दरवाजा आतून बंद होता. वारंवार दरवाजा वाजवल्यानंतरही उघडला जात नसल्याने मैत्रिणीने मोबाइलवर संपर्क साधला; पण मोबाइलही उचलत नसल्याने तिला शंका आली. तिने शांतीलाल यांना कळवले. विवाह सोहळा आटोपून शांतीलाल व इतर औरंगाबादेत पोहोचले होते. शांतीलाल यांनी घराचा दरवाजा तोडला. आत प्रवेश करताच त्यांना ममता आणि चंदनने स्वयंपाकघरातील सीलिंग फॅनला नायलॉनच्या एकाच दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या दोघांच्याही वजनाने फॅन वाकला होता.

रजिस्टर, मोबाइल घेतले ताब्यात
या घटनेची माहिती कळताच दोघांच्याही नातेवाइकांनी अरिहंतनगरात धाव घेतली. त्यानंतर पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया, सहायक पोलिस आयुक्त विजय पवार, पोलिस निरीक्षक हेमंत कदम, सहायक पोलिस निरीक्षक माजिद शेख आणि पोलिस उपनिरीक्षक गणेश धोकरट यांचा फौजफाटा तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. कदम यांनी सांगितले की, दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत पाठवण्यात आले. घराची झाडाझडती घेण्यात आली; परंतु कुठेही सुसाइड नोट आढळून आली नाही. दोघांचे रजिस्टर, मोबाइल ताब्यात घेण्यात आले आहेत. आत्महत्येप्रू्वी या दोघांत काय बोलणे झाले होते, याचा तपास मोबाइल हिस्ट्रीतून कळू शकेल. रजिस्टरमध्ये ममताने रक्ताने ‘चंदन आय लव्ह यू’ असे लिहिलेले निदर्शनास आले आहे. तसेच ममताने दोन दिवसांपूर्वी चंदनचे नाव हातावरही गोंदले होते. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शेख शकील करीत आहेत.

चंदन केव्हा आला, माहिती नाही
पुण्याला गेलेला चंदन नेमका कधी औरंगाबादेत परत आला, ममताच्या घरी केव्हा गेला, याची माहिती शेजार्‍यांनाही नव्हती. ममताचे वडील हृदयरुग्ण असल्याने त्यांनी त्यांच्या जावयामार्फत (ममताच्या मोठय़ा बहिणीचे पती) पोलिसांत जबाब नोंदवला. तिच्या आईने काहीही बोलण्यास नकार दिला.

तीन मे रोजी होता ममताचा विवाह..
ममताच्या घरच्यांनी तीन मे रोजी तिचा विवाह करण्याचे निश्चित केले होते. मात्र, तिचा विवाहास विरोध होता. दोन दिवसांपूर्वीच तिने तिच्या भावी पतीला आपले लग्न अशक्य असल्याचे सांगितले होते, अशी माहितीही नातेवाइकांनी दिली.