आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, ३१ डिसेंबरच्या पहाटे पडले होते घराबाहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चला,मुली आणि मुलाकडील दोन-दोन व्यक्तींनी समोर या, असा जोरात आवाज आला आणि एकच धावपळ सुरू झाली. हा आवाज कुठल्या लग्न सोहळ्यातला नव्हता तर घाटीतील शवविच्छेदन विभागातला होता. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना साक्षीदार हवे होते म्हणून ही घाई सुरू होती.
लग्नाच्या मंडपात या दोघांना एकत्र येणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी मृत्यूला कवटाळले तेही अवघ्या १५ ते १९ वर्षांच्या वयात. शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जटवाडा परिसरातील जोगवाडा या शंभर उंबरठे असलेल्या गावात घटना घडली. संजय कारभारी जाधव (१९), सविता आप्पाराव बनसोडे (१५) या दोघांनी एका शेतातील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ३१ डिसेंबर रोजी पहाटे चार वाजेपासून दोघेही घरातून बेपत्ता झाले होते. शनिवारी त्यांचे मृतदेह विहिरीत सापडल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सविता गुरुवारी पहाटे चार वाजता शौचास जाते म्हणून घराबाहेर पडली होती. पण ती घरी परतलीच नाही. कुटुंबीयांनी शोधाशोध केली. संध्याकाळी कळले की, गावातला संजयदेखील गायब आहे. म्हणून दोघांच्याही कुटुंबीयांनी हर्सूल ठाण्यात मुले बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. सविता अल्पवयीन असल्यामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सविताच्या आईने संशयित म्हणून संजयचे नाव पोलिसांना सांगितले होते.

घरी सांगायला हवे होते... : एवढेमोठे पाऊल उचलण्याआधी या दोघांनी घरी सांगायला हवे होते. अशी प्रतिक्रिया कुटुंबीयांनी दिली. या दोघांनी एकमेकांवर प्रेम असल्याची कल्पनाही दिली नव्हती. त्यांनी कळवले असते तर लग्नासाठी परवानगी दिली असती असे घरच्यांचे म्हणणे आहे. तीन आठवड्यांपूर्वी सविताचा साखरपुडा झाला होता. त्यामुळे आपल्या दोघांना एकत्र येणे शक्य नाही, अशी त्यांची धारणा झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. सहा वर्षांपूर्वी संजयच्या वडिलांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली होती. संजय शहरात एका महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत होता. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तो काही दिवसांपूर्वी कंपनीत काम करत होता. तर सविताचे आई-वडील ऊसतोड कामगार आहेत.

...आणि त्यांचा शोध संपला
जोगवाड्यापासून पाचशे मीटरच्या अंतरावर पवार यांचे शेत आहे. सकाळी ते शेतात गेले आणि मोटार सुरू केली. पाण्याचा उपसा झाल्यानंतर त्यांना दोघांचे मृतदेह दिसले. त्यांनी तत्काळ गावात जाऊन ही माहिती सांगितली. गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले. सहायक पोलिस आयुक्त सुखदेव चौघुले, पोलिस निरीक्षक वसीम हाश्मी, उपनिरीक्षक दिवाकर पाटील, सहायक फौजदार उत्तम गिरी, हवालदार देविदास राठोड घटनास्थळी पोहोचले.