आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या दुर्लक्षित निष्ठावंतांमध्ये असंतोष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या आशीर्वादाने बाहेरच्यांना मानाचे पान मिळत असल्याने भाजपमधील जुने निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीवरून बाजूला ठेवल्याने शहराध्यक्ष भगवान घडामोडे आतल्या आत धुमसत आहेत, तिकडे उपमहापौरपदाचा अर्ज भरण्यावरून मिळालेली वागणूक हा खिल्ली उडवण्यासारखाच प्रकार असल्याने निष्ठावंत नितीन चित्ते दुखावले गेले आहेत. महापौरपदाची निवडणूक बाहेरून आलेले किशनचंद तनवाणी व याआधी बंडखोरी केलेले राजू शिंदे हाताळत असल्याने तर या निष्ठावंतांना कोंडी झाल्याचेच भासत आहे.

शहरात शिवसेनेला चेकमेट देण्यासाठी व पक्षाची ताकद वाढवण्यासाठी माजी आमदार किशनचंद तनवाणी व इतर पक्षांच्या नेत्यांना मानाने भाजपत बोलावण्यात आले. महापालिका निवडणुकीदरम्यान तर हे बाहेरच्यांना फ्री हँड देण्याचे प्रकार खूपच वाढल्याने पक्षात नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

मनपा निवडणुकीच्या निकालानंतर तर तनवाणी यांनी जणू सगळा भाजपच ताब्यात घेतल्यासारख्या हालचाली सुरू केल्याने या निष्ठावंतांत अस्वस्थता वाढली आहे. शिवसेनेवर वचक राहावा व शक्य झाल्यास सेनेला धाकटा भाऊ बनवण्याची रणनीती नव्याने प्रदेशाध्यक्ष झालेल्या दानवे यांच्या मूकसंमतीने आखल्याची चर्चाआहे. त्याचा परिणाम महापौर निवडणुकीत दिसून येत आहे.

घडामोडे नाराज
गेल्या वेळी पत्नीला नगरसेवक करणारे शहराध्यक्ष भगवान घडामोडे यंदा स्वत: निवडून आले. पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी या नात्याने त्यांनी महापौरपदासाठी तयारी दाखवली होती. तशी फील्डिंगही लावली होती. पण सेनेची कोंडी करण्याच्या प्रयत्नात घडामोडे यांना डावलून राजू शिंदे यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय वरून घेण्यात आला. त्यामुळे घडामोडे यांनी अर्जच भरला नाही. त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली नसली तरी ते दुखावले गेले आहेत.

चित्तेही दुखावले
दुसरीकडे उपमहापौर निवडणुकीत आधी बोलावून घेतले, अर्ज भरायला पाठवले व दारातून परत बोलावून बाहेरून आलेल्या प्रमोद राठोड यांना अर्ज भरायला लावल्याने भाजपचे जुने निष्ठावंत नितीन चित्ते नाराज आहेत. नेत्यांच्या बुद्धिबळात आपले हसे झाल्याची भावना त्यांच्या मनात असून नव्याने उगवलेल्या नेतृत्वामुळे ही स्थिती आल्याची भावना भाजपमधील निष्ठावंत व्यक्त करीत आहेत.

त्यांचा सूड, आमची कोंडी
भाजपमधील निष्ठावंत आजही पक्षाची बदनामी नको म्हणून नाव घेऊन बोलायला तयार नाहीत, पण त्यांच्या नाराजीचा रोख स्पष्टपणे तनवाणी व बाहेरचे पाहुणे यांच्याकडेच आहे. शिवसेनेवर त्यांना सूड घ्यायचा आहे, त्यासाठी भाजपची ताकद वाढवण्याच्या नावाखाली दोन पक्षांतील संबंध बिघडत असून पक्षाची विश्वासार्हता व मतदारांतील प्रतिमा संपण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.