आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये स्फोटात महिलेसह 2 जणांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मुकुंदवाडी परिसरातील राजीव गांधीनगरातील एका घरात शुक्रवारी सायंकाळी 4 च्या सुमारास अचानक कशाचा तरी स्फोट होऊन एकाच कुटुंबातील 2 जण ठार झाले आणि एक महिला गंभीर जखमी झाली. घाटी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहे. स्फोटाच्या आवाजाने घटनास्थळ हादरले. 
 

शारदा भावले (50, रा. राजीव गांधीनगर), सूर्यभान कचरू दहिहंडे (55, रा.वाळूज ) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत तर  सुमन दहिहंडे (50. रा. मोहटा देवी, बजाजनगर )असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. 

पोलिसांनी सांगितले की, सूर्यभान आणि सुमन हे बजाजनगरमध्ये  भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. शारदासोबत सुर्यभान यांचे मैत्रीचे संबंध होते. शारदा यांना घर खरेदी करण्यासाठी सुर्यभानने पैसे दिले होते. शुक्रवारी दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास दहिहंडे पती-पत्नी राजीव गांधीनगरातील शारदाच्या घरी गेले. घर नावे करून देण्याच्या मागणीवरुन त्यांच्यात जोरदार भांडण झाले. यावेळी स्वयंपाकाच्या खोलीत अचानक कशाचा तरी स्फोट झाला. 

या घटनेत त्यांच्या घराची भिंत कोसळली आणि तिघेही गंभीररित्या जळाले. या घटनेत शारदा घटनास्थळीच ठार झाली तर दहिहंडे पती-पत्नी गंभीर जळाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत शारदा, जखमी सुमन आणि सूर्यभान यांना घाटी रुग्णालयात दाखल केले.  उपचारा दरम्यान शनिवारी पहाटे सूर्यभान यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्फोटाची माहिती मिळताच बॉम्बशोधक व नाशक पथक, फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मात्र घटनास्थळी त्यांना आक्षेपार्ह काहीच आढळले नाही.

घटनेनंतर गंभीर जखमी पती-पत्नींचा जबाब शुक्रवारी पोलिसांना घेता आले नाही. उपचार दरम्यान जखमी पतीचा मृत्यू झाला. पत्नी देखील मृत्यूशी झुंज देत असल्याने त्यांचाही जबाब नोंद करण्यात आला नसल्याने घरामध्ये तिघांमध्ये नेमके काय घडले,  याबाबत अचूक माहिती पोलिसांना मिळाली नाही. त्यांच्या नातेवाईकांचा जबाब नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची नोंद मुकुंदवाडी पोलिसांनी घेतली असून तपास सुरू आहे.


 

बातम्या आणखी आहेत...