आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत पंचवीस हजार ग्राहकांचे सिलिंडर होणार ‘लॅप्स’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गॅस ग्राहकांना त्यांच्या वाट्याचे 5 अनुदानित गॅस सिलिंडर 31 मार्चपर्यंतच वितरित केले जाणार आहेत. नव्या आर्थिक वर्षात म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत अनुदानावरील 9 सिलिंडर दिले जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या 2012-13 या आर्थिक वर्षातील शिल्लक सिलिंडरचा समावेश पुढील वर्षात होणार नसल्याचे गॅस वितरण कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे 25 हजार ग्राहकांचे अनुदानित सिलिंडर लॅप्स (वाया जाणार) होणार आहेत.

ऑक्टोबर 2012 पासून गॅस सिलिंडर वापरावर र्मयादा आल्या आहेत. त्यामुळे ऑक्टोबर 2012 ते 31 मार्च 2013 पर्यंत केवळ तीन अनुदानित सिलिंडर मिळणार होते. तिन्ही अनुदानाचे सिलिंडर जानेवारीपर्यंत संपल्याने 40 हजार ग्राहकांना विनाअनुदानित सिलिंडर घ्यावे लागले. फेब्रुवारी 2013 मध्ये पुन्हा शासनाने आणखी दोन अनुदानित सिलिंडर मार्चअखेरपर्यंत मंजूर केल्याने अनुदानाचे एकूण पाच सिलिंडर या वर्षात देऊ केले. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात 1 लाख ग्राहकांना एका अनुदानित सिलिंडरचा लाभ मिळाला. पण 25 हजार ग्राहकांचे अनुदानाचे अथवा विनाअनुदानाचेच सिलिंडर रिकामे झाले नाही. त्यामुळे त्यांना मिळणारे अनुदानाचे सिलिंडर लॅप्स होणार आहे. परिणामी या ग्राहकांचे नुक सानच होणार आहे. यात अनेक ग्राहकांचे एक किंवा दोन सिलिंडर लॅप्स होणार आहेत.

असा होईल तोटा
जानेवारीत विनाअनुदानाचे सिलिंडर खरेदी केले. त्यानंतर शासनाने वर्षभरात अनुदानावर नऊ सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी एकच सिलिंडर वापरात येणार असल्याने दुसरे सिलिंडर लॅप्स होणार आहे. त्यामुळे एका सिलिंडरसाठी जास्तीचे पैसे खर्च करूनही दुसरे अनुदानाचे सिलिंडर लॅप्स होणार आहे.

अनेक ग्राहकांचे सिलिंडर लॅप्स होतील
शहरात इंडेनचे 35 हजार ग्राहक असून त्यापैकी पाच हजार ग्राहकांचे अनुदानाचे एक अथवा दोन सिलिंडर लॅप्स होण्याची शक्यता आहे.
-नारायण खडके, संचालक, इंडेन गॅस एजन्सी

ग्राहकांकडून घाई नाही
लॅप्स होणारे सिलिंडर घेण्यासाठी कोणत्याही ग्राहकांकडून घाई करण्यात येत नाही. केवळ पुढील वर्षात उर्वरित सिलिंडर दिले जावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र, नियमानुसार तसे करता येत नाही.
-दीपक व्यास, संचालक, भारत गॅस

पुढील वर्षात उर्वरित सिलिंडरचा समावेश नाही
अनुदानित सिलिंडर या वर्षातच दिले जाणार असल्याने त्याचा समावेश पुढील वर्षात होणार नाही. एक एप्रिलपासून अनुदानित नऊ सिलिंडर दिले जातील.
-आदित्य गुप्ता, विभागीय विक्री अधिकारी, हिंदुस्तान पेट्रोलियम.