आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदामात या, सिलिंडर घेऊन जा; ग्राहकांनी तक्रार केल्यास एजन्सीवर कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ग्राहकांना गॅस सिलिंडर पाहिजे असल्यास त्यांनी स्वत: गोदामात यावे आणि सिलिंडर घेऊन जावे, अशी परिस्थिती गॅस एजन्सी आणि त्यांच्या आडमुठय़ा कर्मचार्‍यांमुळे निर्माण झाली आहे. यामुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

गॅस सिलिंडरसाठी सुरुवातीला 1100 रुपये भरावे लागत आहेत. त्यानंतर मिळणारे अनुदान आणि आधार संलग्नीकरणाने त्रस्त असलेल्या ग्राहकांना आता एजन्सीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांनी गॅस बुकिंग करून 20 दिवस झाले तरी घरपोच सिलिंडर येत नाही. ग्राहक रिकामे सिलिंडर घेऊन गोदामात जाईल तेव्हाच त्याला सिलिंडर मिळत असल्याचे समोर आले आहे. सिलिंडर मिळत नसल्याची तक्रार केल्यास गोदामातून सिलिंडर घेऊन जा, असे उत्तर एजन्सीच्या कर्मचार्‍यांकडून देण्यात येते. एजन्सीवर गेल्यानंतर तेथील कर्मचारी व्यवस्थित बोलतही नाहीत. काही ग्राहकांनी प्रातिनिधिक स्वरूपात व्यंकटेश गॅस एजन्सीविरुद्ध ‘दिव्य मराठी’कडे आपबीती कथन केली. असे प्रकार शहरातील सर्वच एजन्सीजमध्ये सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, याबाबत ग्राहकांनी थेट कंपनीकडे तक्रार केल्यास एजन्सीवर कारवाई करून तक्रारी दूर केल्या जातील, असे भारत गॅस कंपनीच्या अधिकार्‍याने सांगितले.

तर ग्राहकांनी तक्रार करावी
ज्या ग्राहकांना वेळेवर सिलिंडर मिळत नाही, घरपोच सिलिंडरऐवजी गोदामातून सिलिंडर घेऊन जावे लागते तसेच घरपोच सिलिंडर देण्याचे काम करणार्‍या कर्मचार्‍यांकडून जास्तीचे पैसे घेण्यात येत असल्याचे आढळून आल्यास ग्राहकांनी कंपनीकडे तक्रार करणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या तक्रारी तत्काळ निकाली काढण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर आहे.

गोदामातून घेतले सिलिंडर
5 डिसेंबर रोजी बुकिंग करून सिलिंडर मिळाले नाही. एजन्सीवर गेलो. उद्धट उत्तरे देऊन तेथील कर्मचार्‍यांनी पळवून लावले. दुसर्‍या दिवशी फोनवर संपर्क साधला असता गोदामात जाऊन सिलिंडर घ्या, असे सांगण्यात आले. तेथेही ग्राहकांची झुंबड उडाली होती. एच. बी. गोपीनवार, ग्राहक, व्यंकटेश गॅस एजन्सी

सुट्यांमुळे उशीर
गॅस बुकिंग केल्यानंतर मध्यंतरी सुट्या आल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांना सिलिंडर मिळण्यास विलंब होत आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना सिलिंडर देण्यासाठी एजन्सीकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. व्यंकटेश काकडे, संचालक, व्यंकटेश गॅस एजन्सी