आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता एसएमएसवर कळेल सिलिंडरची किंमत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गॅस सिलिंडरच्या वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने मोबाइलद्वारे बुकिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली. आता त्याच्या पुढचा पल्ला गाठत गॅस कंपन्यांनी बुकिंगच्या एसएमएसमध्ये सिलिंडरची किंमत नमूद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे एजन्सी आणि डिलिव्हरी बॉयच्या मनमानीला आळा बसणार आहे. काही कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यापासून ही सुविधा सुरू केली.

बुकिंग करण्यात आलेले सिलिंडर अनुदानित आहे की विनाअनुदानित याची माहिती ग्राहकाला व्हावी म्हणून एसएमएसमध्ये सिलिंडरच्या रकमेचा समावेश करण्यात आला आहे. या सेवेचा ग्राहकांना मोठय़ा प्रमाणात फायदा होणार आहे. बुकिंग केलेले सिलिंडर अनुदानित सिलिंडरपैकी कितवे आहे आणि त्यासाठी किती रकम द्यावी लागेल याची माहिती सिलिंडरच्या डिलिव्हरीपूर्वी ग्राहकांना मिळणार आहे. ही सुविधा सध्या हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम कंपनीच्या ग्राहकांना देण्यात येत आहे. इंडेन कंपनीच्या ग्राहकांसाठी ही सुविधा अद्याप सुरू करण्यात आली नाही.

शहरातील 74 हजार ग्राहकांना या सेवेचा फायदा मिळणार नाही. ज्या ग्राहकांनी मोबाइलवरून सिलिंडर बुकिंग केली आहे, अशा ग्राहकांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ज्यांनी प्रत्यक्ष एजन्सीवर येऊन अथवा लँडलाइनवरून बुकिंग केली आहे, त्यांना याचा लाभ मिळणार नाही.


हा होईल फायदा !
सिलिंडरची संख्या, रकमेची माहिती सिलिंडर येण्यापूर्वीच मिळेल
एजन्सी, कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये पैशावरून खटके उडणार नाहीत
सिलिंडरची रक्कम अगोदरच माहिती होणार असल्याने पैशाची व्यवस्था करता येईल

इंडियन ऑइल कंपनीने ही सेवा सुरू केली नाही. त्यामुळे आमच्या ग्राहकांना एसएमएस सेवेचा लाभ मिळणार नाही. अजय यादव, विभागीय विक्री अधिकारी, आयओसी
ग्राहकांनाच या सेवेचा मोठय़ा प्रमाणात लाभ होणार आहे. मात्र, त्यासाठी ग्राहकांनी सिलिंडर बुकिंगसाठी मोबाइलचा वापर करणे आवश्यक आहे. मंगेश आस्वार, संचालक, भारत गॅस एजन्सी
याअगोदर एजन्सी किंवा डिलिव्हरी बॉय जास्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात येत होत्या. या सुविधेमुळे त्या तक्रारींमध्ये घट होईल. कुठल्याही माहितीसाठी ग्राहकांना एजन्सीवर जाण्याची गरज पडणार नाही. आदित्य गुप्ता, विभागीय विक्री अधिकारी, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनी.