आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅडम.. आता तुम्हीच न्याय मिळवून द्या! महिला आयोगासमोर पीडित महिलेने मांडली व्यथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - 'मॅडम..सगळीकडे न्याय मागून थकले. आता तुमच्यासमोर पदर पसरते. तुम्हीच न्याय मिळवून द्या,’ असे अार्जव ५५ वर्षीय लीलाबाई सांडुजी भुईगळ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडे केले.

लीलाबाई गेल्या ३८ वर्षांपासून न्यायासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत. १९७७ मध्ये त्यांचे फुलंब्री येथील सांडू नावाच्या व्यक्तीशी लग्न झाले. १९८० मध्ये लीलाबाई प्रसूतीसाठी औरंगाबादेत आल्या. त्यांना पुत्रप्राप्ती झाली. नंतर त्या घरी परतल्या तेव्हा पती, सासू आणि सवतीने त्यांना घराबाहेर काढले. जगण्यासाठी आधार म्हणून नवऱ्याच्या हिश्शातील जमिनीचा तुकडा मिळावा यासाठी त्या गेल्या २८ वर्षांपासून प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. अखेर त्या महिला आयोगाकडे गाऱ्हाणे मांडण्यासाठी शुक्रवारी सुभेदारीत हजर झाल्या. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी त्यांची बाजू ऐकून घेत त्यांना मदतीचे आश्वासन दिले.
महिला आयोगाच्या सदस्या आणि पोलिस अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी पाचच्या सुमारास सुभेदारी विश्रामगृहात बैठक झाली. शहरात महिलांच्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बलात्कार, विनयभंग, हुंड्यासाठी छळ असे प्रकार वाढत आहेत. हे प्रमाण कमी कसे करता येईल याबाबत या बैठकीत चर्चा झाली. पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक महिलेची तक्रार नोंदवली गेली पाहिजे, अशा सूचना रहाटकर यांनी केल्या.
या वेळी पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त संदीप आटोळे, आमदार अतुल सावे, किशनचंद तनवाणी, पोलिस निरीक्षक भारत काकडे, सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील, उपनिरीक्षक रवींद्र बागूल यांची उपस्थिती होती. शहरात वाढलेले मंगळसूत्र चोरीचे प्रकार, मुलींची छेडखानी, घरगुती हिंसाचार अशा घटनांत पोलिसांकडून समुपदेशन व्हावे, अशा सूचनाही रहाटकर यांनी केल्या. शहरातील प्रत्येक खासगी सरकारी कार्यालये, शाळा-महाविद्यालये आणि कंपन्यांत महिलांच्या सुरक्षेसाठी विशाखा समिती आहे का, याचीदेखील प्रशासकीय पातळीवर पाहणी केली जाईल, असे रहाटकर यांनी सांगितले.
रसिकाआणि राधाचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात : शहरआणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांत महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. सासरच्या त्रासाला कंटाळून रसिका फड आणि राहुलनगर येथील राधा त्रिभुवन या दोन्ही विवाहितांनी आत्महत्या केल्या. हे खटले फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्याचे प्रयत्न महिला आयोगाकडून करण्यात येतील. याशिवाय एमआयडीसी सिडको येथील विद्यार्थिनीवरील बलात्कारप्रकरणी आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार कायदा लावण्यात येईल, असेही रहाटकर यांनी सांगितले. मुकुंदवाडी येथे सुनेकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या सासरच्या मंडळींवर पिटा कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...