आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगमंचाच्या ग्लॅमरपोटी नृत्य शिकणे चुकीचे - माधवी मुदगल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नृत्यकलेत गुरुकुल परंपरेचे विशेष महत्त्व आहे. गुरुकुलांमुळे नृत्यकला जिवंत राहिली आहे, आता अनेकजण याकडे वळतात. रंगमंचाभोवती ग्लॅमरचे वलय निर्माण झाले आहे, पण फक्त त्यामुळेच या कलेकडे वळणे चुकीचे आहे असे मत महागामीतर्फे आयोजित परिसंवादाप्रसंगी पद्मश्री माधवी मुदगल यांनी व्यक्त केले.
ओडिसी नृत्यशैली मुदगल या प्रसिद्ध आणि ख्यातनाम गुरू आहेत. या नृत्यातील सूक्ष्म भेद शिष्यांना समजावून सांगताना त्या म्हणाल्या, गुरुकुल परंपरेतील शिक्षणाने एकाग्रपणे अभ्यास होतो. प्रदीर्घ काळापासून चालत आलेल्या या परंपरेने शिष्यांना दूरदृष्टी देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. प्रायोगिक ज्ञान आणि शास्त्रीय ज्ञान यांचा समन्वय साधण्याचे महत्त्वपूर्ण काम शिष्यांनी करायला हवे. गुरू बी रुजवतात, त्याचे बहारदार वृक्षात रूपांतर करण्याचे काम शिष्यांचे आहे. नृत्य आराधना करण्यासाठी प्रचंड संयम आणि समर्पण हवे असते.
कलावंतांना सुरुवातीलाच चांगले दर्जेदार कार्यक्रम करण्याची संधी मिळेल असे नाही, पण निराश होऊ नका, साधना परिपक्व होताना अनेक संधी आपोआप तुमच्या पुढे चालत येतात. गुरुकुल परंपरेला वेगळे अस्तित्व आहे, कलेची उपासना करणे हा तोंडाचा खेळ नाही. परिपक्व होताना अनेक कष्ट सहन करण्याची वेळ येते ते करा, तेव्हाच तुमच्यात दडलेला महान कलावंत तापून सलाखून बाहेर येईल. प्रत्येक महान कलावंताची सुरुवात ही लहान कार्यक्रमांतून झाली आहे, एकदम सगळं काही मिळत नाही. तेव्हा आपल्या गुरूंना पहिले स्थान द्या, एकाग्र चित्ताने साधना करा, नटराजाचे आशीर्वाद नक्कीच मिळतील असा विश्वासही मुदगल यांनी शिष्यांना दिला.
यानंतर भारतीय संगीत नृत्य अकादमीच्या अध्यक्षा लीला सॅमसन यांनीही महागामीत नृत्य साधकांना मार्गदर्शन केले. प्रत्येकाने रियाझ करावा, तो बुद्धिहीनपणे करू नये. प्रत्येक कलावंताला सुरुवातीच्या काळात अडचणी आलेल्या आहेत. परफॉर्मन्स आणि पुरस्कारांकडे लक्ष देऊन कोणत्याही कलेचा अभ्यास करणे गैर आहे, असे काम करा की, परफॉर्मन्स आणि पुरस्कार तुमच्या पाठीशी चालत येतील. कला जिवंत ठेवण्याचे धनुष्य येण-या पिढीला पेलावे लागणार आहे.