आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओडिसी नृत्यझंकाराने बहरली संध्याकाळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ओडिसीचे अध्वर्यू (कै.) गुरू केलुचरण महापात्र यांच्या वरिष्ठ शिष्या आणि ख्यातनाम नृत्यांगना माधवी मुद्गल यांचा हृदयात साठवून ठेवावा असा मोहमयी नृत्याविष्कार, तर शिष्यांचा चित्तवेधी आविष्कार... पार्वती दत्ता यांचे तडफदार कथ्थक व ऋत्विक संन्याल यांच्या धीरगंभीर धृपद गायनाने शारंगदेव महोत्सवाचा दुसरा दिवस गाजला.
महोत्सवाच्या दुस-या दिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली ती डॉ. ऋत्विक संन्याल यांच्या धृपद गायनाने. राग ‘श्री’मध्ये आलाप, जोड व झाला या पारंपरिक पद्धतीनेच त्यांचे गायन रंगत गेले. नोमतोमसह खर्जातील मुक्तसंचार धृपदची खोली वाढवत गेला, तर द्रुत लयीतला झाला केवळ अप्रतिम असाच होता. चौतालातील शिवाची स्तुती करणारी पारंपरिक रचना त्यांनी वैविध्यपूर्ण लयक्रीडेसह पेश केली. माणिक मुंडे यांची गायनाला चिकटून झालेली पखवाजाची साथ पोषक होती. सरस्वतीची स्तुती करणा-या सूरतालातील स्वरचित पदाने त्यांनी गायनाची सांगता केली.
प्रसिद्ध ओडिसी व कथ्थक नृत्यांगना पार्वती दत्ता यांचे दुस-या दिवशी प्रभावी कथ्थक झाले. एकाच वेळी दोन्ही शास्त्रीय नृत्यप्रकारांमध्ये पारंगत दत्ता यांनीच मराठवाड्यात या प्रकारांचा ख-या अर्थाने प्रचार केला. यंदाच्या कार्यक्रमात त्यांनी विविध पारंपरिक बंदिशी, रचनांसह पं. बिरजू महाराज यांचा सांगीतिक दृष्टिकोन दर्शवणा-या वेगळ्या रचनाही पेश केल्या. विलंबित तीनतालात ‘नाद उपासक’ या प्रकाराने त्यांनी सुरुवात केली. ‘धाट’, ‘आमद’, तर विद्युत चपळाईयुक्त हालचालींनी परिपूर्ण ‘परमेलू’ या प्रकारांसह सम सोडून केवळ शेवटच्या आवर्तनातच समेवर येणा-या बोलसमूहाने रंगत आणली. समेवर येणा-या ‘धा’च्या ठिकाणी ‘ध्यान’ या शब्दाच्या उच्चारणासह त्याची अनुभूती देणा-या थीममधून वेगवेगळ्या बोलसमूहांद्वारे समेवर येताना आनंद विरळाच होता. पं. विभव नागेशकर यांचा तबला, सुखद मुंडे यांचे पखवाज, मनोज देसार्इंचे गायन, सुनील अवचट यांची बासरी व संदीप मिश्रा यांची सारंगी कथ्थक फुलवणारी होती.
शेवटच्या भागात माधवी मुद्गल व शिष्यांचे मंत्रमुग्ध करणारे ओडिसी नृत्य झाले. ‘रंगस्तुती’, ‘विस्तार’ या प्रकारांनी त्यांनी विलक्षण रंग उधळण्यास सुरुवात केली. हळुवार व प्रमाणबद्ध हालचाली, अतिशय मोहक हस्तमुद्रा, प्रसन्न मुद्राभिनय व संपूर्ण देहबोलीच नृत्यमय झालेला सर्वांचा आविष्कार अलौकिक असाच होता.
दहा युवतींचे पूर्णपणे एकजिनसी नृत्य व मुद्गल यांचे विचारी दिग्दर्शन पदोपदी जाणवले. माधवीजींचे नृत्य जेवढे प्रतिभाशाली तेवढेच भावदग्धही. ‘कुमारसंभवम’मधील शिव-पार्वतीचा दोन युवतींनी सादर केलेला प्रसंग संस्मरणीय असाच होता. ‘वाद्यवैविध्य’ या वाद्यांच्या व नृत्याच्या उत्कट मेळ्याने कार्यक्रमाचा समारोप झाला. मधुप मुद्गल यांचे सुंदर संगीत होते.