आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रंथाच्या प्रकाशनातून कळले राम-माधव यांच्या मैत्रीचे बंध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ माधवराव चितळे हे शालेय जीवनापासून मित्र. पुण्यातील एकाच संघाच्या शाखेत जाणाऱ्या दोघांवरही बालपणीच रामायण ग्रंथाचे संस्कार झाले. त्यांची ही अनोखी मैत्री प्रथमच सर्वांना कळली ती रामायण ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने. संत एकनाथ रंगमंदिरात दोघांनी श्रोत्यांना रामायण ग्रंथाशी निगडित असलेल्या अनेक अनोख्या गोष्टी सांगून आश्चर्यचकित केले.
जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांचा रामायणावर गाढा अभ्यास आहे याची माहिती लोकांना प्रथमच शुक्रवारी कळली. त्यांनी २००४ मध्ये औरंगाबाद शहरातील टिळकनगरातील बालाजी मंदिरात रामायणावर ८८ प्रवचने दिली. त्याचे आॅडिओ रेकाॅर्डिंग नोट्सही त्यांच्या पत्नी विजयाताई चितळे यांनी करून ठेवल्या होत्या. त्याचे तब्बल बारा वर्षांनंतर पुस्तकरूपाने आज शुक्रवारी राम नाईक यांच्या हस्ते संत एकनाथ रंगमंदिरात थाटात प्रकाशन झाले. अत्यंत सुनियोजित कार्यक्रमात वाल्मीकी रामायणावरील दोन मित्रांचे विचार एेकून अवघे सभागृह राेमांचित झाले. जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ असलेल्या माधवरावांनी रामायणातील अनेक वैज्ञानिक दाखले दिले, तर नाईक यांनी गीतरामायण लिहिणाऱ्या ग.िद.माडगूळकरांच्या आठवणी सांगून आश्चर्याचा धक्का दिला. या कार्यक्रमात राजकारणाला कुठेही थारा नव्हता.
जलतज्ज्ञांच्यामुखातून प्रकटले अनोखे रामायण : जलतज्ज्ञमाधवराव चितळे यांनी वाल्मीकी रामायण या त्यांच्या ग्रंथावर बोलताना प्रथमच सभागृहाशी मुक्तपणे संवाद साधला. एरवी अगदी मोजके बोलणारे माधवराव आज राम नाईकांच्या आग्रहाने दिलखुलास बोलले. ते म्हणाले, या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक २३३ उघडा. त्यात एक नकाशा दिलाय. यात प्रभू रामचंद्र वनवासाला अयाेध्येतून नाशिकला जाताना औरंगाबाद शहरातून गेले. संत एकनाथ रंगमंदिर ज्या भागात आहे तेथेच ते थांबले होते. तो नकाशा या पुस्तकात आहे. कायगाव टोका आणि बीड शहराला रामायणकालीन संदर्भ आहेत. बीड जिल्ह्यातील राक्षसभुवन गावात राक्षसांची प्रशासकीय कार्यालये होती. लोणार त्या काळी सांस्कृतिक केंद्र होते.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या भोजनालयात रामायणातील चित्रे : अत्यंतमृदू अन् ओघवत्या भाषेत माधवराव चितळे यांनी रामायणाचे वैश्विक स्वरूप प्रकट केले. ते म्हणाले, आपल्याला वाटते फक्त भारतातच रामायण माहीत आहे किंवा त्याचा प्रचार झाला आहे. पण तसे नाही. मी स्वत: पाहिलेय, संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय रोममध्ये आहे. तेथील भोजनालयात रामायणातील घटनेवर आधारित सुंदर चित्रे आहेत. अनिपरीक्षेसाठी तयार झालेल्या सीतामाईचे पेंटिंग तेथे बघून मी आश्चर्यचकीत झालो. सर्व जगाला रामायण माहीत आहे. श्रीलंकेत तर आजही अनेक पुरावे सापडतात. इंडोनेशियातही रामाच्या मूर्ती मिळतात.

माधवरावांमुळे उत्तम संसदपटू झालो : उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक म्हणाले, मी तीन वेळा आमदार अन् पाच वेळा खासदार झालो खरा; पण हुशार संसदपटू म्हणून माझी देशाला ओळख झाली ती माझा बालपणीचा सखा माधवमुळे. मी आमदार असताना त्यांना विषयांची टिपणे द्यायचो. माधवराव सुंदर भाषण लिहून द्यायचे. लोकसभेत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे विश्वासू सचिव म्हणून माधवराव होते. तेथेही मला माधवरावांचीच मदत झाली. गीतरामायणकार ग.दि.माडगूळकर हे माझ्या घरी राहिले. त्यामुळे माझ्यावर ग.दि माडगूळकरांच्या गीतरामायणाचा मोठा प्रभाव आहे. माधव आणि मी १९५० मध्ये पुण्यातून दहावी झालो. फर्ग्युसनमध्ये शिकलो. पुढे आमचे मार्ग बदलले; पण रामायणावरचा व्यासंग नाही बदलला.

माधवरावांचेरामायण सर्व भारतीय भाषांत सरकार छापणार
राम नाईकांनी सांगितले की, मी राज्यपाल असल्याने काही घोषणा करू शकत नाही; पण आश्वासन देऊ शकतो. माधवरावांनी लिहिलेली ही कलाकृती अजरामर आहे. कारण त्यांनी बारकाईने अनेक संदर्भ शास्त्रीय वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिले अाहेत. केंद्रीय मानव संसाधनमंत्री प्रकाश जावडेकरांनी मला सांगितले की, माधवरावांनी लिहिलेला हा अनमोल ग्रंथ केंद्र सरकार सर्व भारतीय भाषांतून प्रसिद्ध करील. प्रकाशक बाबा भांड यांनी याचा पाठपुरावा करावा.

विजयाताईंना अश्रू अनावर : व्यासपीठावरग्रंथाचे संपादन करणाऱ्या पुणे येथील आशा देवधर, प्रकाशक बाबा भांड आणि माधवरावांच्या पत्नी विजयाताई चितळे होत्या. या दोघींसह अनेक मुलामुलींनी हातभार लावला. या सर्वांसह टिळकनगर बालाजी मंदिरातील सहकाऱ्यांचा सत्कार राम नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना विजयाताईंना अश्रू अनावर झाले. कारण प्रवचनांचे पुस्तक तयार करण्याचे त्यांचे स्वप्न १२ वर्षांनी साकारले, तेही राम नाईक या बालपणीच्या मित्राच्या समोर. सूत्रसंचालन सारंग टाकळकर यांनी तर आभारप्रदर्शन ज्योती नांदेडकर यांनी केले. राष्ट्रगीत क्षितिजा सहस्रबुद्धे यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...