आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मधुरिमा क्लब’ चा मराठी बाणा जपणारा सांस्कृतिक सोहळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ‘श्रावणात घननिळा बरसला’ या लता मंगेशकरांच्या आवाजातील अजरामर गीताची मोहिनी अजूनही कायम असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या ‘मधुरिमा क्लब’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रकर्षाने जाणवले. मंगळागौरनिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेत स्पर्धकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. ही चुरशीची स्पर्धा जल्लोष, उत्साह, टाळ्या, शिट्यांच्या साक्षीने संस्मरणीय झाली. संस्कृती ग्रुपने यात बाजी मारली.
मराठी बाणा जपणारी, पारंपरिक खेळांना आधुनिकतेची किनार देणारी ही स्पर्धा शहरात पहिल्यांदाच ‘दिव्य मराठी’ने आयोजित केली. औरंगाबादसोबतच बीड, माजलगावच्या संघांनीही यामध्ये सहभाग नोंदवला. योग, नृत्य आणि शारीरिक क्षमता त्याकाळीही या खेळांच्या माध्यमातून जपली गेली, असा संदेश स्पर्धेतून देण्यात आला. फुगडी, झिम्मा, धन्नाधतुडी, सूप, घागर, तवा अशा जवळपास 30 ते 35 खेळांचे सादरीकरण असलेले नृत्य प्रकार महिलांनी अतिशय ताकदीने सादर केले. पारंपरिक वेशभूषा, नृत्यांची लकब आणि मराठमोळ्या संस्कृतीचे याद्वारे दर्शन घडले. सध्याच्या काळात वृक्षलागवड, पाऊस, दुष्काळ, मुलींच्या जन्माचे स्वागत, हुंडाबंदी, स्त्रीमुक्ती, महिला सुरक्षितता आणि आधुनिक जीवनशैली यावर महिलांनी खणखणीत भाष्य केले.
फुगड्यांचे थक्क करणारे प्रकार : दहा संघांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमात फुगड्यांचे प्रकार थक्क करणारे होते. योगगुरू डॉ. चारुलता रोजेकर, आहारतज्ज्ञ डॉ. संगीता देशपांडे आणि नृत्यगुरू केतकी नेवपूरकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उद्योजिका जयश्री सोमासे आणि वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या व्यवस्थापक माधुरी घाडगे यांची उपस्थिती होती.

पाऊस गाणी..
अरविंद पिंगळे, बागेश्री पिंगळे आणि डॉ. धनश्री सरदेशपांडे यांच्या बहारदार पाऊस गाण्यांत रसिकही चिंब झाले. या स्वरमयी सोहळ्याला राजेश देहाडे, संकेत देहाडे, विनोद वाहूळ, जितेंद्र साळवी यांनी वाद्यवृंद म्हणून साथ दिली. अश्विनी दाशरथे यांनी बहारदार निवेदन केले. कविता, उखाण्यांनी कार्यक्रमाला रंगत आणली. सोहळ्याच्या यशस्वितेसाठी मधुरिमा क्लबच्या संयोजिका वृषाली घाटणेकर, अश्विनी निटूरकर, मंजू खंडेलवाल, स्वाती सोळुंके, सुप्रिया भारस्वाडकर यांनी सहकार्य केले.

स्पर्धेत विजयी ठरलेले संघ
स्पर्धेमध्ये तीन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. यामध्ये सन्मित्र ग्रुप (माजलगाव), रंजना तुळशी गु्रप आणि सरस्वती ग्रुप (बीड) यांनी अनुक्रमे उत्तेजनार्थ प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले. चुरशीच्या या स्पर्धेत संस्कृती ग्रुप, मैत्रीण ग्रुप आणि कलाश्री ग्रुपने अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले.

सांस्कृतिक वारसा जपणारा विलक्षण कार्यक्रम
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पूर्वी आजीकडून वर्णन केलेले खेळ आम्हाला पाहता आले. या कार्यक्रमातून मनोरंजन, शारीरिक व्यायाम, संस्कृतीची जपणूक झाली आहे. कीर्ती देशपांडे
निखळ आनंद मिळाला
महिलांनी उत्स्फूर्तपणे केलेले सादरीकरण थक्क करणारे होते. अतिशय ताकदीने आणि चपळाईने सादर केलेले सर्वच खेळ निखळ आनंद देणारे आहेत, आमच्या पिढीला हे खेळ यानिमित्ताने पाहता आले हे आमचे भाग्यच आहे.

अपूर्वा कुलकर्णी
लहानपणीचे पाहिलेले खेळ पुन्हा अनुभवण्याची संधी आम्ही प्रेक्षक म्हणून या कार्यक्रमाला आलो. माझे कुणीही संघामध्ये नाही, पण आपली संस्कृती जपणारे हे खेळ लहानपणी पाहिले. आज यानिमित्ताने पुन्हा अनुभवण्याची संधी मिळाली. प्रमोद अत्रे