आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जादूच्या विश्वात रमली मॉडर्न इंग्लिश स्कूलची मुले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जादूच्या प्रयोगांतून होणारी धमाल आणि मजा मंगळवारी (24 डिसेंबर) नवखंडा परिसरात असलेल्या मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली. विज्ञानाचा वापर आणि गमतीजमती दाखवून 35 ते 40 जादूचे प्रयोग जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी सादर केले. दोन तासांच्या प्रयोगांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले.
हातातून विविध रंगी रुमाल काढणे, पीस काढणे, पत्त्यांचे प्रयोग असे विविध जादूचे खेळ दाखवण्यात आले. पाणी, खाऊ मुलांच्या हातून काढून घेताना त्यांच्या चेहर्‍यावर आश्चर्याचे भाव उमटलेले होते.
पुण्याहून आलेले जितेंद्र रघुवीर हे प्रख्यात जादूगार रघुवीर यांचे नातू आहेत. अमेरिकेत बी. ई. प्रॉडक्शन आणि त्यापुढील उच्च शिक्षण घेतलेले जितेंद्र शाळा, महाविद्यालयांतून प्रयोग घेण्यासोबतच विज्ञानाचे महत्त्व पटवून देतात.
जादूच्या प्रयोगांनंतर मुलांनी जादू शिकवण्यासाठी, त्यांची पुस्तके घेण्यासाठी आणि विशेष म्हणजे त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी मंचावर तोबा गर्दी केली होती.
जादू म्हणजे फक्त मनोरंजन
>जादू लोकांचे मनोरंजन करण्यासाठी आहे. माझी जादू पूर्णत: विज्ञानाधिष्ठित आणि मनोरंजन करणारी आहे. जादूमुळे आपण लोकांना हसवून आनंदी करू शकतो. मात्र, कुठल्याही मानसिक आजारांवर किंवा काही मिळवण्यासाठी जादू नाही.
-जितेंद्र रघुवीर, जादूगार
>जादूच्या प्रयोगांमध्ये खूप मजा आली. आमच्या शाळेतील मुलांनी मागितलेला खाऊ जादूने आला. विविध प्रयोगाने खूप हसलो.
-सानिका वानखेडे, विद्यार्थिनी
>जादूगाराने मला बोलावले आणि कुठलाही खाऊ सांगा म्हणाले. मी फुटाण्याचे नाव घेताच त्यांनी मला खूप सारे फुटाणे दिले. खूप धम्माल केली.
-हशीर रोहान, विद्यार्थी