आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लय, ताल, छंद, गिनतीचा अनोखा बिरजोत्सव!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लय, ताल, छंद, गिनतीसह विविध पारंपरिक रचना, तिहाया व आकर्षक कथानकात, काव्यात बांधलेल्या बंदिशी म्हणजे कथ्थक नृत्याला वेगळी विचारदृष्टी देणा-या पं. बिरजू महाराजांचा नादोत्सव. असा हा सृजनोत्सव औरंगाबादकर रसिकांनी ‘याचि देही याचि डोळा’ आकंठ अनुभवला. जणू हा बिरजोत्सवच होता.
‘महागामी’तर्फे आयोजित शारंगदेव महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाचेच नव्हे तर संपूर्ण महोत्सवाचे आकर्षण होते बिरजू महाराज. या कार्यक्रमाला सुरुवात झाली ती सात शास्त्रीय नृत्यांच्या अनोख्या संगमातून दाखवलेल्या ‘सप्तसंधी’ कार्यक्रमाद्वारे. ओडिसी, भरतनाट्यम, कुचिपुडी, मणिपुरी, मोहिनीअट्टम, कथकली व कथ्थक या प्राचीन शास्त्रीय नृत्य प्रकारांना अतिशय बेमालूमपणे एकत्र बांधतानाच संस्कृतीशी नाळ कशी एकत्रच जोडली गेलेली आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न सुंदर व स्तुत्य असाच होता. एकच भाव वेगवेगळ्या नृत्यशैलीतून कसा व्यक्त होतो,याचे त्या त्या शैलीतील वाद्य व संगीताच्या आधारे केलेले सादरीकरण तितकेच मोहकही होते. प्रत्येक नृत्यशैलीच्या हस्तमुद्रा, पदन्यास, पदसंचालन स्वतंत्र; पण एका माळेत त्यांना सुरेलपणे विणण्यात आले. सात नद्यांचा संगमही सप्तसुरांमध्ये मिसळला. पार्वती दत्ता यांची संकल्पना व दिग्दर्शन होते. पार्वती दत्ता (ओडिसी), संजीव भट्टाचार्य (मणिपुरी), अमृता लाहिरी (कुचिपुडी), सुचिंद्र नाथन (कथकली), पवित्र भट (भरतनाट्यम), कण्णगी गोसावी (कथ्थक), सुजाता नायर (मोहिनीअट्टम) यांच्या नृत्याने कार्यक्रम चढत्या क्रमाने रंगत गेला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पं. बिरजू महाराज यांनी मंचाचा ताबा घेतला व सुरू झाली गिनती, लय, ताल व लयकारीची सफर. गिनती, छंद या प्रकारांसह विलक्षण लयकारीने कथ्थकला वेगळी दिशा देणारे बिरजू महाराज हे लयीचे बादशहा समजले जातात ते कशामुळे, हे पहिल्या मोजक्या काही मिनिटांमध्ये समजतेच. तीनतालात सगळी मुशाफिरी झाली. विलंबित, मध्य व दृत लयीतल्या वेगवेगळ्या बंदिशी वेगवेगळ्या भावांद्वारे व कथानकाचे रूप घेऊन सादर झाल्या. खास बिरजू महाराजांची देण असलेल्या गिनती प्रकाराने शब्दश: बहार आणली. असंख्य गिनतीच्या प्रकारांमध्ये, तसेच छंद व उपज अंगाने सादर झालेल्या रचनांमध्ये रसिक चिंब भिजले. कुठल्याही वाद्यांविना केवळ तत्कारातून (खास फूटवर्क) सादर झालेल्या रचना, बंदिशी अप्रतिमच होत्या. आक्रमक तिहायांच्या वर्षावातच महाराजजींच्या शिष्या शाश्वती सेन यांनीही अतिशय तयारीचे नृत्य सादर केले. महाराजजींचा कथ्थकविषयीचा दृष्टिकोन शाश्वतीद्वारे मांडण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. शाश्वती सेनसोबत बिरजू महाराजांनी वाजवलेला अतिशय तयारीचा तबला त्यांची ताल, संगीतावरची हुकुमत सिद्ध करणारा होता. बंदिशीतला महाराजजींचा कल्पनाविलास शाश्वती सेन यांनी प्रभावीरीत्या मांडला. सादरीकरणापूर्वी एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम यांच्या हस्ते पं. बिरजू महाराजांना शारंगदेव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्यानंतर व वयाच्या 74 व्या वर्षी महाराजजींचे कथ्थक रसिकांना दीर्घ काळापर्यंत स्मरणात राहील, हे निश्चित.