आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनपावली आली महालक्ष्मी, घराघरातून सुख-समृद्धी घेऊन आल्या ज्येष्ठा-कनिष्ठा गौरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- घरोघर सुख, शांती आणि समृद्धीचा ठेवा घेऊन येणारी महालक्ष्मी विराजमान झाली आहे. "महालक्ष्मी कोण्या पावली आली, महालक्ष्मी सोन्याच्या पावली आली' म्हणत महिलांनी पारंपरिक जरीकाठाचे वस्त्र परिधान करून गौरींचे आवाहन केले. ज्येष्ठा, कनिष्ठा गौरींचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण कुटुंब सज्ज होते. घंटानाद आणि महालक्ष्मी गीतांनी मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. लक्ष्मीची पावले रांगोळीच्या माध्यमातून घरात मांगल्य घेऊन आली. लक्ष्मींच्या स्वागतासाठी आधीपासूनच सज्ज असलेल्या मखरात डोळे दिपवणारी रोषणाई आणि सजावट लक्ष वेधत होती. पुढील तीन दिवस घरामध्ये वास्तव्य करणाऱ्या गौरी आपल्या पिलांसह विराजमान झाल्या आहेत. भाकरी आणि मेथीच्या भाजीचा पहिला नैवेद्य या वेळी महालक्ष्मींना दाखवण्यात आला. मखरात खाद्यपदार्थ, धनधान्याची आरास लावण्यात आली होती. उद्या महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी घराघरातून पुरणावरणाचा नैवेद्य दाखवण्यात येईल.
वाजत-गाजत आगमन
काही घरांतून राशीच्या लक्ष्मी बसवण्यात आल्या. जरीकाठाच्या साड्या नेसलेल्या महालक्ष्मींचे लोभस रूप प्रसन्नता, मांगल्य घेऊन आल्याचा अनुभव अनेकांनी घेतला. महालक्ष्मी आवाहनाचा मुहूर्त संध्याकाळी ६.०७ वाजेपर्यंत असल्याने सायंकाळी अनेक घरांमध्ये लक्ष्मींना वाजतगाजत बसवण्यात आले.

१६ चे महत्त्व
मराठी कुटुंबांत ही गौर महालक्ष्मीचे रूप मानली जाते. बेल, तुळस, आघाडा अशी पत्री आणि चाफा वगैरे फुलांसह षोडश उपचारांनी पूजा केली जाते. नैवेद्यासाठी पुरण-वरण, १६ भाज्या, भजी अशी १६ प्रकारची पक्वान्ने बनवली जातात. आरतीमध्येही १६ दिवे लावतात. या गौरीच्या व्रताला षोडशा उमा व्रत म्हणत असल्याने ह्य१६ह्णचं महत्त्व आहे! व्रत उद्यापन चंद्रिकेतील उल्लेखाप्रमाणे पूर्वी हे व्रत १६ दिवस चालत असे गौरीला बांधावयाच्या दोरकाला दररोज एक याप्रमाणे १६ गाठी बांधून त्यांची पूजा केली जाई, असे अनंत पांडव गुरुजी यांनी सांगितले.

नैवेद्याच्या १६ भाज्या
पालक, मेथी, चुका, आळू, अंबाडी, पत्ताकोबी, फुलकोबी, लाल भोपळा, गिलके, दोडके, गवार, वालाच्या शेंगा, कारले, भेंडी, पडवळ, शेवग्याच्या शेंगा, सिमला मिरची, दुधी भोपळा, चाकी (चक्री), चवळीच्या शेंगा यांपैकी १६ भाज्या केल्या जातात.