आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानगर समितीची सदस्य निवड आज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद महानगर निगम नियोजन समितीची स्थापना करण्यात आली. समिती सदस्य निवड प्रक्रिया उद्या 17 जानेवारीला सुरू होणार आहे. 20 जानेवारी रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती नगर परिषद प्रशासन विभाग प्रमुख सुरेश दानापुरे यांनी नुकतीच दिली.
शहराचा वाढता विस्तार पाहता केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्य शासनाने समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. या समितीत येणारी गावे व त्यांची लोकसंख्या लक्षात घेता सदस्य निवड प्रक्रिया करण्याची सूचना राज्य शासनाने प्रशासनास केली. मोठे नागरी क्षेत्र असलेल्या शहरातून 19 सदस्य निवडण्यात येणार असून यासाठी 97 नगरसेवक मतदान करतील.
छोट्या नागरी क्षेत्रातून एक सदस्य निवडण्यात येणार असून यासाठी खुलताबाद नगरपालिकेचे 17 सदस्य मतदान करतील, तर ग्रामीण निर्वाचन क्षेत्रातून दहा सदस्य निवडीसाठी 310 गावांचे 176 सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष, पैठण, गंगापूर, खुलताबाद, फुलंब्री व औरंगाबाद पंचायत समिती सभापती मतदान करणार आहेत.
याशिवाय 15 सदस्यांची शासन नियुक्ती करणार असून यामध्ये दोन आमदार, महानगरपालिका आयुक्त, मुख्याधिकारी खुलताबाद आणि प्राधिकरणाचे तज्ज्ञ अधिकारी यांचा समावेश राहणार आहे. सदस्य निवडीची प्रारूप मतदार यादी 17 जानेवारी रोजी लावण्यात येणार असून 18 ते 20 जानेवारीदरम्यान आक्षेप अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अंतिम यादी 20 जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे दानापुरे यांनी सांगितले.