आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Election 2014 News In Marathi, Divya Marathi

युतीचे त्रांगडे अन् आघाडीच्या बिघाडीत अपक्ष शिरजोर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अद्यापपर्यंत युतीचे त्रांगडे अन् आघाडीची बिघाडी सुरू असून यातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर होऊ शकली नाही. त्यामुळे उमेदवारांनी वेट अँड वॉचची भूमिका घेत राजकारणात केव्हाही, कधीही, काहीही होऊ शकत असल्याने जे व्हायचे ते होईल, असे म्हणत आपला अर्ज भरून ठेवायला सुरुवात केली आहे.
काही इच्छुकांनी पितृपक्षातील चांगल्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मानस केला आहे. काहींनी दबावतंत्राचा वापर म्हणून अर्ज घेतल्याचे दिसते. काहींनी पक्षाची उमेदवारी नाही मिळाली तरी निवडणुकीच्या रिंगणातून माघार न घेण्याचा निर्धार केला आहे. अपक्षांनी राजकीय वचपा काढण्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. बऱ्याच अपक्ष उमेदवारांनी आपले कार्यालयही थाटले आहे. अपक्षांच्या कार्यालयांवरील कार्यकर्त्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. त्यांच्या कार्यालयांवरील कार्यकर्त्यांची संख्या प्रमुख पक्षाच्या उमेदवारासह भल्याभल्यांचे गणित बिघडवू शकते असे दिसते आहे. शिवसेनेकडून विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपली उमेदवारी नक्की समजून तयारी केली आहे, तर राष्ट्रवादीचे उदयसिंग राजपूत यांना आघाडी होऊन व राष्ट्रवादीला जागा सुटून आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे. काँग्रेसकडून माजी आमदार नामदेव पवार यांना दावेदार समजले जाते, तर अनिल सोनवणे यांनीही जोर लावला आहे.

पितृपक्षानंतरच उमेदवारी
पितृपक्षानंतर बरेच उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता असून भाजपतर्फे संजय खंबायते, बन्सीधर निकम यांनीही विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचे मनसुबे व्यक्त केले जात आहेत. एकूणच युती व आघाडी होवो ना होवो, आपण उमेदवारी अर्ज दाखल करणारच, असा बऱ्याच जणांनी निर्धार केला आहे. अर्ज दाखल होऊन मागे घेण्याच्या मुदतीनंतरच चित्र स्पष्ट होणार असले तरीही २७ तारखेपर्यंत कदाचित अपक्षांचा जोर कायम राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.