आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Elections Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेने अर्ध्या रस्त्यावरच उतरवले भाजपचे झेंडे, जैस्वालांच्या मिरवणुकीत फक्त भगवे नि निळे झेंडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- युती होणार की नाही अशा द्विधा मन:स्थितीत असलेल्या शिवसैनिकांनी प्रदीप जैस्वाल यांच्या मिरवणुकीदरम्यान अर्ध्या रस्त्यावरच भाजपच्या कमळाचे झेंडे उतरवून टाकले. त्याच्या पुढे काही अंतर गेल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचा पिवळा झेंडाही मिरवणुकीतून गायब झाला. स्वाभिमानी राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्तेच सहभागी झाले नव्हते. भगवे आणि निळ्या झेंड्यांच्या साक्षीने जैस्वाल यांनी खासदार चंद्रकांत खैरे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, जयंत ओक, महापौर कला ओझा यांच्या उपस्थितीत अर्ज सादर केला. क्रांती चौकातून निघालेल्या रॅलीदरम्यान जैस्वाल यांनी शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. क्रांती चौक, टिळक पथ, गुलमंडीमार्गे संस्थान गणपती येथे गेल्यानंतर मिरवणुकीचा समारोप झाला.
सकाळी ११ वाजता निघालेल्या मिरवणुकीचा प्रारंभ क्रांती चौकातून झाला. या वेळी भगवा, निळा व पिवळा असे तिन्ही झेंडे होते. मिरवणूक सिल्लेखान्याच्या पुढे आल्यानंतर युती तुटली, असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये आला अन् प्रथम भाजपचे झेंडे बाजूला काढण्यात आले, तरीही पिवळा झेंडा मात्र फडकत होता. पुढे गेल्यानंतर घटक पक्षही भाजपबरोबर गेल्याचा संदेश आला. त्यामुळे पिवळे झेंडेही गायब करण्यात आले. पैठण गेट येथून फक्त भगवे आणि निळे झेंडे तेवढेच दिसत होते. मिरवणूक सुरू असतानाच जैस्वाल यांनी मध्यच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज सादर केला. बमणे यांनी रॅलीची परवानगी घेतली होती. परंतु ही रॅली इतकी मोठी असेल याची कल्पना पोलिसांनाही नव्हती. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल केला नव्हता.
अर्जासाठी खैरेंनी घेतला डिस्चार्ज
दोन शस्त्रक्रिया झाल्याने गेल्या काही दिवसांपासून खा. खैरे धूत रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना घरी जाण्याची परवानगी अजून डॉक्टरांनी दिली नाही. मात्र सकाळी त्यांनी हट्ट करून काही कालावधीसाठी डिस्चार्ज मिळवला आणि अर्ज दाखल करण्यासाठी ते आले. प्रकृती ठीक नसताना कशासाठी बाहेर पडले, असा प्रश्न त्यांना केला असता हे पक्ष कर्तव्य आहे. त्यासाठी मी तहान-भूक, आजार विसरून काम करणारच. पक्षकार्य हेच माझे टॉनिक आहे, असे त्यांनी सांगितले.

गर्दीत युतीचीच चर्चा
मिरवणूक क्रांती चौकापासून जसजशी पुढे सरकत होती तशी प्रदीप जैस्वाल यांना पक्षाने अधिकृतपणे दिलेली उमेदवारी, त्यांच्या विजयाची शक्यता, दावा यावर चर्चा न होता युतीचे काय झाले हीच चर्चा होती. सिल्लेखान्यापर्यंत मिरवणूक येईपर्यंत युती अभेद्य असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे भाजप व राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते नसतानाही झेंडे मात्र हाती ठेवण्यात आले होते. परंतु सिल्लेखान्यात भाजपचा तर पुढे पिवळा झेंडाही काढल्याने युती संपली यावरच चर्चा होती.