आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखा फंडा: दोनशे वासुदेव, कुडमुडे ज्योतिषी करणार भाजपचा प्रचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ‘बोल पोपटा’ राज्यात कोणाचे सरकार येणार आहे? ‘सांग पोपटा आघाडी सरकारने कामे केली की नाही?’ अशा प्रश्नांची उत्तरे देत काही ज्योतिषी तुम्हाला आता दारोदारी फिरताना दिसतील. तसेच गेल्या अनेक वर्षात शहरी व ग्रामीण भागातही लुप्त झालेली रामप्रहरी येणारी वासुदेवाची स्वारीही फ्लॅट संस्कृतीत वावरताना दिसणार आहे. मात्र यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दोनशे वासुदेव व दोनशे कुडमुडे ज्योतिषाच्या माध्यमातून प्रचाराचा असा अनोखा फंडा भाजपने योजला आहे.

मराठवाड्यातील भाजपकडील २१ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक संचलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी औगाबादेत बैठक झाली. या वेळी औरंगाबाद,जालना, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्य‌ांतील पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत त्यांना प्रचाराच्या नियोजनाची माहिती देण्यात आली. तसेच २ ते ५ सप्टेबर दरम्यान भाजपचा प्रत्येक विधानसभा निहाय जाहीरनामा स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले की, भाजपच्या प्रचाराबाबतची राज्यात विभागनिहाय बैठका घेण्यात आल्या. मराठवाड्यात लातूर आणि औरंगाबादमध्ये बैठका पार पडल्या. यामध्ये प्रत्येक विधानसभा संचलन समितीच्या २० पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. यात स्थानिक पातळीवर जाहीरनामा तयार करण्याचाही समावेश आहे.

मित्रपक्षांनाही फायदा
२ ते ५ सप्टेंबर दरम्यान स्थानिक विषयांची माहिती घेऊन प्रदेशकडून मंजुरी मिळवून प्रत्येक मतदारसंघाचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. तसेच भाजपचा राज्यस्तरीय जाहीरनामा १५ सप्टेबरला घोषित केला जाणार आहे. महायुतीमध्ये सर्वानी एकत्रित काम करावे आणि भाजपसह मित्रपक्षांचाही फायदा व्हावा यासाठी हा जाहीरनामा प्रसिद्ध करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

भाजपच्या या बैठकीत अखिल भारतीय सहसंघटनमंत्री व्ही.सतीश तसेच प्रदेश सरचिटणीस रवींद्र भुसारी, विधानसभा संचलन समिती समन्वयक श्रीकांत भारतीय, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रचारकार्याबद्दल उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीत एकनाथ जाधव, हरिभाऊ बागडे, श्रीकांत जोशी, बापू घडामोडे, प्रवीण घुगे, भागवत कराड , दिलीप थोरात, बबन लोणीकर आदींची उपस्थिती होती.

मॉर्निंग वॉकला फुलांनी स्वागत
प्रचारासाठी पारंपरिक पद्धतीबरोबरच नव्या कल्पनांचा वापर करण्याचा सल्ला पदाधिकाऱ्यांना देण्यात आला. सकाळी फिरण्यासाठी आलेल्या लोकांना गुलाबाचे फूल देणे, पथनाट्याच्या माध्यमातून प्रचार करणे, वासुदेव आणि ज्योतिषाच्या माध्यमातून प्रचार करण्यात येणार आहे.
आघाडीचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणार
वासुदेव आणि ज्योतिषींच्या माध्यमातून घरोघरी जाऊन राज्यातील आघाडी सरकारचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचा प्रयोग राबविला जाणार असल्याचे श्रीकांत भारतीय यांनी सांिगतले. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत असा प्रयोग राबविण्यात आला होता, त्याला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच कीर्तनाच्या माध्यमातूनही प्रचार करण्याचे आवाहन करण्यात आले.