आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण : प्रदेशाध्यक्षपदाची धुरा अशोक चव्हाणांच्या खांद्यावर?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे राजकीय पुनर्वसन केले जाण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी दिले. चव्हाण हे ज्येष्ठ नेते असून संघटना मजबूत करण्यासाठी त्यांचा हातभार लागेल, असे ठाकरे म्हणाले. आपली मंत्रिपदाची मागणी नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.


मराठवाड्यातील तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या बैठकीनंतर ठाकरे म्हणाले, ‘संघटनात्मक बदलांची प्रक्रिया कायम चालू असते. श्रेष्ठी त्यावर निर्णय घेत असतात.’ चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी सक्षम प्रदेशाध्यक्ष हवा, असे विधान केले होते. त्याबाबत ठाकरे म्हणाले, चव्हाण मुख्यमंत्री असताना मी प्रदेशाध्यक्ष होतो. आम्ही काँग्रेसची सत्ता आणली. त्यामुळे ते प्रदेशाध्यक्ष सक्षम असावा असे बोलले असतील, असे वाटत नाही. त्यांना पक्षात निश्चितच उज्ज्वल भवितव्य आहे.


निवडणुका स्वबळावर लढवण्याची भूमिका स्पष्टपणे मांडणा-या ठाकरे यांनी काही भागातील पदाधिका-यांचे तसे मत असल्याचे सांगत एकत्र लढायचे की स्वतंत्र याचा निर्णय योग्य वेळी श्रेष्ठी घेतील, असे सांगत सुटका करून घेतली.


‘एमआयएम’चा परिणाम होणार नाही
एमआयएमचा काँग्रेसवर परिणाम होणार नाही. आक्रमक बोलणा-यांचे लोक काही दिवस ऐकतात; पण विकासाचा विचार देणा-या काँगे्रसला पर्याय नाही, असे ठाकरे म्हणाले.


भ्रष्टाचाराचे आरोप फक्त मंत्र्यांवरच...
राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे सरकारची प्रतिमा खराब होते का, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले की, भ्रष्टाचाराचे आरोप हे व्यक्तिगत मंत्र्यांवर आहेत. त्यामुळे सरकारची प्रतिमा खराब झाली असे म्हणता येणार नाही. पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा चांगली आहे. भ्रष्टाचाराचा आरोप नाही. त्यामुळे काँग्रेसवर कोणतेही शिंतोडे उडालेले नाहीत.