आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Government Allocates 200 Acres For IIM In Mihan

आयआयएम नागपूरला पळवण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री कार्यालयाचे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बहुचर्चित आयआयएम ही संस्था औरंगाबादेत येणार असा आशावाद असला तरी प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही संस्थाही एम्सपाठोपाठ नागपूरला पळवण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न असल्याचे समोर येत आहे. प्रशासकीय सूत्रांनीही यास खासगीत बोलताना दुजोरा दिला आहे.

हिवाळी अधिवेशनादरम्यान या प्रकल्पाच्या इमारतीचे नागपुरात भूमिपूजन केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

औरंगाबादेत होऊ घातलेल्या डीएमआयसी प्रकल्पासाठी या संस्थेची गरज असल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने तातडीने तीन ठिकाणची जागा या संस्थेसाठी देऊ केली. करोडी, अब्दीमंडी तसेच डीएमआयसीमध्ये हा प्रकल्प होऊ शकेल, असे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी राज्य शासनाला पाठवलेल्या अहवालात नमूद केले होते. कधी नव्हे ते प्रशासनाच्या वतीने तातडीने अहवाल शासनाला देण्यात आला. त्यामुळे पंधरा दिवसांत आयआयएमची जागा निश्चित केली जाईल, असे वाटत असतानाच ही संस्था औरंगाबादऐवजी नागपूर येथे उभारण्याचे संकेत मुख्यमंत्री कार्यालयाने दिल्याचे सांगण्यात येते. यावर अजून अधिकृत निर्णय झाला नसला तरी वैदर्भीय मुख्यमंत्री फडणवीस ही संस्था नागपुरात नेण्यासाठी आग्रही असल्याचे समजते.

त्या दिशेने प्रशासकीय प्रयत्न सुरू झाले असून नागपूर येथील जागाही निश्चित झाल्याचे समजते. अर्थात याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. मात्र हिवाळी अधिवेशनादरम्यान या प्रकल्पाच्या इमारतीचे नागपुरात भूमिपूजन केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा औरंगाबादकरांच्या तोंडाला पाने पुसली जाणार हे नक्की होत असल्याचे सूत्रांकडून समजते.

विदर्भ वेगळा करणार, मग पळवापळवी का?
भाजप वेगळ्या विदर्भाला अनुकूल आहे. केंद्र व राज्यात सत्ता असल्याने आज ना उद्या वेगळा विदर्भ केला जाऊही शकतो. मग महाराष्ट्राच्या वाट्याला मिळालेले आयआयएम विदर्भात पळवण्याचे कारण काय, असा सवाल या निमित्ताने मराठवाड्यातील जनतेतून केला जात आहे.