आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्फ बोर्डाच्या ८६ लाखांच्या साहित्य खरेदीत महाघोटाळा !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात सन २०१३ मध्ये करण्यात आलेल्या कार्यालयीन साहित्याच्या खरेदीत ८५ लाख ९० हजारांचा खोटाळा झाल्याची बाब सोमवारी उघड झाली. वक्फ बोर्डाच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नसीम बानो पटेल यांनी सोमवारी दुपारी २.१५ च्या सुमारास वक्फच्या कार्यालयात, तर ३.३० च्या सुमारास चिकलठाण्यात मेडिएटरच्या गाेदामात ठेवलेल्या साहित्याची पाहणी केली. खरेदी केलेल्या साहित्याची बिलावरील किंमत प्रत्यक्ष साहित्यात फरक असल्याचे या पाहणीत स्पष्ट झाले. विशेष म्हणजे सध्या कमी किमतीत मिळणाऱ्या या वस्तू सन २०१३ मध्ये जास्त दराने खरेदी केल्याची बाबही पुढे आली.
कार्यालयीन वस्तू म्हणजेच कॉम्प्युटर, झेरॉक्स मशीन, फ्रँकिंग मशीन, प्रिंटर खरेदीत घोटाळा झाल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी सीईओ, मंत्र्यांकडे केल्या होत्या. यानंतर काही दिवसांपूर्वीच २५ लाखांच्या १५ झेरॉक्स मशीन शनिवारी सुटीच्या दिवशी कार्यालयात आणल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. चार वर्षांनंतर या मशीन कशा प्रकटल्या, असा प्रश्न वक्फ बोर्डातील लेखा अधिकारी मुजफ्फर सिद्दिकी यांना पत्रकार नागरिकांनी विचारताच हे साहित्य चिकलठाण्यातून आणल्याचे सांगितले होते. काही नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र, तक्रार नसल्यामुळे हस्तक्षेप करता येणार नाही, असे उत्तर पोलिसांनी दिले. त्यामुळे नागरिकांनी हे साहित्य परत पाठवण्यास भाग पाडले होते. काही पत्रकारांनी प्रभारी सीईओ पटेल यांच्याकडे चौकशी केली. त्यावर सोमवारी या प्रकरणाची सखोल चौकशी करू, असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार सोमवारी पाहणी करताच हा प्रकार उघडकीस आला.
अल्पसंख्याक विभागाने २०१२ मध्ये पाच विभागीय कार्यालयांतील साहित्य खरेदीसाठी तीन कोटी ८५ लाख ९० हजारांचा निधी दिला होता. त्यातील तीन कोटी रुपये वक्फ बोर्डाकडे जमा आहेत. उर्वरित ८५ लाख ९० हजारांच्या निधीतून १९ जून २०१३ रोजी २५ लाखांच्या १५ झेरॉक्स मशीन खरेदी केल्या होत्या. लाख ५६ हजार ५०० रुपयांचे प्रिंटर, १८ लाख ८३ हजार ३६९ रुपयांचे फ्रँकिंग मशीन तसेच १६ लाख ६८ हजार ७२० रुपयांचे कॉम्प्युटर इतर साहित्य अशी खरेदी करण्यात आली होती. हे साहित्य कार्यालयासह मेडिएटरच्या गोदामात ठेवण्यात आले होते. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सलीम पटेल वाहेगावकर यांनी साहित्य तपासणीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी पटेल यांच्याकडे केली आहे.

उडवा उडवीची उत्तरे
तीन वर्षांपासून साहित्य दिसत नसल्याची माहिती मागवूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. शुक्रवारी काही नागरिकांनी प्रभारी सीईओ नसीमबानो पटेल यांना भेटून साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याची तक्रार केली होती. पटेल यांनी सोमवारी पाहणी करू, असे सांगितले होते. त्यानुसार करण्यात आलेल्या पाहणीनंतर सर्व प्रकार उघडकीस आला. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेले तत्कालीन सीईओ एन.डी.पठाण, निलंबित लिपिक इफ्तेखार उल्लाह बेग, लेखा अधिकारी मुजफ्फर सिद्दिकी यांच्या अडचणीत सोमवारी झालेल्या पाहणीमुळे वाढ होण्याची चिन्हे आहेत.

कार्यालयातही केली तपासणी
साहित्य खरेदीतील काही वस्तू वक्फ बोर्डाच्या कार्यालयातही ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तू, खरेदीच्या नोंदी वक्फच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नसीमबानो पटेल यांनी तपासून घेतल्या.

माझा संबंध नाही
^आमच्या गोदामात ठेवलेल्या साहित्याशी माझा संबंध नाही. नितीन बागवे यांच्याकडून हे साहित्य खरेदी केले होते. जागा नसल्यामुळे गोदामात ठेवण्यात आले असेल. साहित्य विकल्याची कागदपत्रे बागवे यांच्याकडे आहेत. - उत्तमसिंह पवार, माजीखासदार
अनियमितता आढळली
^वक्फबोर्डात२०१३ मध्ये खरेदी केलेल्या साहित्यात अनियमितता असल्याचे आढळून आले आहे. वारंवार तक्रारी अाल्यामुळे तपासणी केली. दोषींवर कारवाई करण्यात येईल. - नसीमबानो पटेल, प्रभारीमुख्य कार्यकारी अधिकारी

वाॅरंटी, गॅरंटी संपली
सन २०१३ मध्ये खरेदी केलेल्या या कार्यालयीन साहित्याची वॉरंटी, गॅरंटी संपली तरी या वस्तू वापरण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या प्रकारास जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून भरपाई करून घ्यावी, अशी मागणी होत आहे.