औरंगाबाद - ब्राह्मण समाजातील लोकांना येत्या निवडणुकीत केवळ गृहीत न धरता मानाचे स्थान द्या. अन्यथा राजकीय पक्षांना हा समाज
आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने दिला आहे. राज्यातील २८८ पैकी ५७ मतदारसंघांत विजयी उमेदवार ठरवण्याची, तर २० जागांवर उमेदवार पाडण्याची ताकद या समाजात असल्याचा दावाही महासंघाने केला. आमच्या समाजाच्या मागण्या मान्य करून त्यास जाहीरनाम्यात स्थान द्या, अन्यथा महासंघातर्फे स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले जातील, असा इशाराही देण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे रविवारी बीडमध्ये राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला. यात महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांच्यासह सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी असे ३२५ जण उपस्थित होते.
‘दीड महिन्यापासून महासंघाचे स्वयंसेवक राज्यभरात घरोघरी जाऊन मतदार सर्वेक्षणाचा फॉर्म भरून घेत आहेत. या सर्वेक्षणातून महासंघाला ब्राह्मण समाजाच्या ताकदीचा अंदाज आला आहे. राज्यातील ५७ मतदारसंघांत ब्राह्मण समाज निर्णायक संख्येत आहे. या ठिकाणी हा समाज एखाद्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, तर किमान २० ठिकाणी जिंकता नाही आले तरी तेथे विजयी होणाऱ्या उमेदवाराला पाडण्याची ताकद या समाजात आहे. पूर्व औरंगाबादेतही सुमारे ६० ते ७० हजार मतदार ब्राह्मण आहेत, अशी आकडेवारी या सर्वेक्षणातून समोर आली आहे. हे मतदान निर्णायक ठरू शकते.
काय आहेत मागण्या?
महासंघाने उमेदवारांकडे तीन महत्त्वपूर्ण मागण्या ठेवल्या आहेत. ब्राह्मण समाजाला ऊठसूठ हिणवणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी लावण्याची तरतूद द्या, पौरोहित्य करणाऱ्यांना शासनाकडून ५ हजार रुपये मानधन द्या आणि ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या मागण्या मान्य करणाऱ्या उमेदवारांना पक्षाचा विचार न करता महासंघ पाठिंबा देणार आहे; पण त्यांनी या मागण्यांचा आपल्या जाहीरनाम्यात समावेश करावा, अशी अट घालण्यात आली आहे. ब्राह्मणबहुल ५७ मतदारसंघांत ब्राह्मण उमेदवारच देण्याचा आग्रहही महासंघाने केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये महासंघाच्या वतीने भगवान कुलकर्णी उभे राहणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
ताकद दाखवणार
ब्राह्मण मतदारांना आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी गृहीत धरले होते. यामुळेच स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही या समाजासाठी कोणतीच धोरणे नाहीत. लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४७ उमेदवारांना महासंघाने पाठिंबा दिला होता. पैकी ३६ विजयी झाले होते. विधानसभेतही आम्ही एकजुटीने मतदान करून जास्तीत जास्त उमेदवार विजयी करून आपली ताकद दाखवून देऊ.
डॉ. संतोष सवई, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, औरंगाबाद