औरंगाबाद - महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने पाच वर्षांत विविध योजनांअंतर्गत ५ हजार १३२ लाभार्थींना १५ कोटी ७४ लाख ६१ हजार रुपयांचे वाटप केले. मात्र, लाभार्थींनी कर्ज परताव्याची एक दमडीही भरली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्धांना स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य देण्यासाठी १० जुलै १९७८ रोजी या महामंडळाची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यात २००९ पासून आतापर्यंत या महामंडळाच्या माध्यमातून बीज भांडवल योजनेंतर्गत १ कोटी ८९ लाख ९१ हजार ४३१ रुपये कर्ज वाटप करण्यात आले. ५० टक्के अनुदान योजनेअंतर्गत १३ कोटी ८४ लाख ७० हजार रुपयांचे वाटप करण्यात आले असे एकूण १५ कोटी ७४ लाख ६१ हजार रुपयांचे वाटप झाले. लाभार्थींना कार्यालयातून फक्त नोटिसाच पाठवल्या जात आहे. कोट्यवधी रुपये लाभार्थी भरतील याची कार्यालयातील अधिकाऱ्यांनाही शाश्वती नाही. या सर्व प्रकारामुळे महामंडळात कुणाचे घर भरले जात आहे, याचाही सरकार दरबारी विचार होणे गरजेचे आहे.
एजंट बसतात ठाण मांडून
कार्यालय उघडण्यापूर्वी बरेच एजंट ठाण मांडून बसतात. टोळक्याटोळक्याने येऊन आमच्या एवढ्या फायली आहेत त्या ताबडतोब मंजूर करा, असे सांगून अधिकाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार होत असतात. यामुळे अधिकारी, कर्मचारीही वैतागले आहेत, अशी चर्चा कार्यालयात सुरू आहे.
वसुली नाही, काय करणार?
आम्ही नोटिसा पाठवतो. वसुली तर नाही, परंतु काम करताना आम्हाला खूप अडचणी येतात. काही मंडळी दबाव आणून आम्हाला काम करू देत नाही. आम्ही काम कसे करावे, असा प्रश्न आम्हाला पडतो.
बी. जे. चव्हाण, व्यवस्थापक