आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - महावीर चौक (बाबा) उड्डाणपूल हा पूर्व-पश्चिम दिशेने नगरकडे असा प्रस्तावित होता, पण संरक्षण विभागाकडून परवानगीस विलंब होत असल्यामुळे पुलासाठी रेल्वेस्टेशन ते मध्यवर्ती बसस्थानक हा उत्तर-दक्षिण दिशेचा पर्याय तपासला जात आहे. त्यासाठी लवकरच सर्वेक्षण होणार आहे.
शहर एकात्मिक रस्ते विकास योजनेअंतर्गत चार उड्डाणपूल आणि एक फूट ओव्हर ब्रिज यांच्या शिल्लक कामांच्या सर्वेक्षणास मंजुरी मिळालेली आहे. त्यात महावीर चौक (बाबा), मोंढा नाका, शिवाजीनगर व सिडको बसस्थानक चौक येथील पुलांचा समावेश आहे. त्यापैकी महावीर चौक येथील उड्डाणपूल हा पूर्वेकडून नगरकडे जाणार्या पश्चिमेकडील छावणीच्या रस्त्यावर उभारण्याचा प्रस्ताव होता, पण संरक्षण विभागाच्या हद्दीत येत असल्यामुळे त्याला संरक्षण विभागाची मंजुरी आवश्यक असणार आहे. ही मंजुरी मिळण्यास होणारा विलंब लक्षात घेता पुलाची दिशा बदलण्याच्या पर्यायावर विचार सुरू आहे.
पुलाची निकड लक्षात घेता राज्य महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) आपल्या हक्काच्या जागेतच पुलाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रेल्वेस्थानक ते मध्यवर्ती बसस्थानक या मार्गावर हा पूल उभारण्याच्या दिशेने सर्वेक्षण केले जाणार आहे, पण काही तांत्रिक अडचणींमुळे सर्वेक्षणासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
‘दिव्य मराठी’ने वर्तवली होती शक्यता
यासंदर्भात 18 डिसेंबर 2012 रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या वृत्तामध्ये दिव्य मराठीने उड्डाणपुलाची दिशा बदलणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती. आता प्रत्यक्षात यासंदर्भात विचार सुरू झाला आहे.
उत्तर- दक्षिण म्हणजेच रेल्वेस्टेशन रस्ता ते मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणार्या रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्यासाठीची शक्यता पडताळली जाणार आहे. रेल्वेस्टेशनकडे जाणार्या रस्त्यावर उड्डाणपूल संपण्याच्या जागी पंचवटी चौक आहे. या चौकात उड्डाणपुलाचे शेवटचे टोक येणार आहे. या ठिकाणी उंची ठेवायची काय? यासाठी तांत्रिक सल्लागार तपासणी करणार आहे. तसेच सिडको बसस्थानक चौकातील पूल संपायच्या जागी चिकलठाण्याकडे जाणार्या रस्त्यावर एपीआय कॉर्नर चौक आहे. येथेही पूल संपवायचा की उंची ठेवायची यासंबंधीही तपासणी केली जाईल.
अशा आहेत अडचणी
खर्च टाळण्यासाठी उत्तर-दक्षिण सर्वेक्षण
परवानगीस विलंब झाल्यास काम दीर्घ काळ रखडेल व यावर केला जाणारा खर्चही वाया जाऊ नये यासाठी महावीर चौकातील पुलाचे उत्तर-दक्षिण सर्वेक्षण होईल. शरद अष्टपुत्रे, कार्यकारी अभियंता, राज्य रस्ते विकास महामंडळ, औरंगाबाद
वर्दळीवर पर्याय उड्डाणपूल
अत्यंत वर्दळीच्या महावीर चौकात उड्डाणपुलाची जोरदार मागणी आहे. मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीस अडथळा होत असल्याने या पुलाचे काम तातडीने हाती घेण्यासाठी मागणी होत आहे. चौकातून पुणे, मुंबई, नाशिक, धुळे, सुरत आदी महत्त्वाच्या शहरांकडे वाहने जातात. जिल्हा न्यायालये, विविध विमा कार्यालये, रेल्वेस्टेशन, बसस्थानक आदी ठिकाणची वाहतूक येथूनच विभागली जाते. त्यामुळे येथील पुलाचे काम प्रथम झाल्यास रहदारीवरील मोठा ताण कमी होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.