आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: महावीर जयंती जन्मोत्सव; तरुणींच्या ढोल पथकाने वेधले लक्ष, सजीव देखाव्यांतून संदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भगवान महावीर जयंतीनिमित्त रविवारी पैठण गेट येथून भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. मिरवणुकीत रथामध्ये महावीरांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. या वेळी महिला, पुरुषांसह बालगोपाळ भक्तिभाव आणि उत्साहाने सहभागी झाले होते.  (छाया: अरुण तळेकर) - Divya Marathi
भगवान महावीर जयंतीनिमित्त रविवारी पैठण गेट येथून भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. मिरवणुकीत रथामध्ये महावीरांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. या वेळी महिला, पुरुषांसह बालगोपाळ भक्तिभाव आणि उत्साहाने सहभागी झाले होते. (छाया: अरुण तळेकर)
औरंगाबाद - भगवान महावीरांची २६१६ वी जयंती रविवारी भरगच्च कार्यक्रमांनी साजरी झाली. बाबा पेट्रोल पंप येथील महावीर स्तंभावर ध्वजारोहण, उत्तमचंद ठोळे छात्रालय तसेच गुरुगणेशनगरातही ध्वजारोहण झाले. पैठण गेट येथून निघालेल्या भव्य शोभायात्रेने शहराचे लक्ष वेधले. ‘त्रिशलानंद वीर की, जय बोलो महावीर की’ या जयघोषाने संपूर्ण वातावरण दुमदुमुन गेले. अभूतपूर्व उत्साह अन् जल्लोषाने भरलेल्या वातावरणात महावीर जयंतीचे पर्व गुंफले गेले. 
सकल जैन समाजाच्या या सोहळ्यात सामाजिक संदेश आणि एकतेचा परिचय आला. या वेळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, महासचिव महावीर पाटणी यांच्यासह जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष वृषभ कासलीवाल, कार्याध्यक्ष विनोद बोकडिया,भारती बागरेचा, मुकेश साहुजी, अनिल संचेती, मिठालाल कांकरिया, नीलेश सावलकर, राजेश मुथा, विलास साहुजी, अशोक अजमेरा, डी. बी. कासलीवाल, चांदमल सुराणा, चांदमल चांदीवाल, माणिकचंद गंगवाल, शांतीलाल संचेती, तनसुख झांबड, जी. एम. बोथरा, दिगंबर क्षीरसागर, मदनलाल अच्छा, एम. आर. बडजाते, हिराचंद कासलीवाल, संजय संचेती, रवी मुगदिया, सुधीर साहुजी, डॉ. प्रकाश झांबड, भावना सेठिया, मंगला पारख, करण सावजी, विनोद लोहाडे, प्रकाश बाफना, रतीलाल मुगदिया, दिलीप कासलीवाल, नरेंद्र गेल्डा, डॉ. तुषार चुडीवाल उपस्थित होते. 
 
पैठण गेट, गुलमंडी, सिटी चौक, शहागंजमार्गे शोभायात्रा राजाबाजार जैन मंदिरात विसर्जित झाली. विविध सामाजिक संदेश, जिवंत देखावे, घोषणा आणि संदेशपत्रे शहरवासीयांना आकर्षित करत होती. शोभायात्रेच्या सुरुवातीला ज्ञानमती माताजी आणि मांगीतुंगी येथे निर्माण करण्यात आलेल्या भगवंतांच्या १०८ फुटांच्या मूर्तीचा देखावा होता. प्रेरणा स्वाध्याय महिला मंडळाच्या वतीने बालमजुरी आणि पशुहत्या रोखण्याचा संदेश देणारा देखावा सादर करण्यात आला. महावीर मेट्रोसिटी इंटरनॅशनल, एन-३ जैन मंदिराचे प्रतिनिधित्वही यामध्ये करण्यात आले. जैन इंजिनिअरिंग सोसायटीच्या वतीने सौरऊर्जेचे महत्त्व, उपयोग सांगणारा मार्गदर्शक देखावा लक्ष वेधणारा होता. वीज वाचवण्याचा संदेश यातून देण्यात आला. 

भारतीय जैन संघटना, पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने दोन हजार गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी जे काम करत आहे, त्याची माहिती पोस्टरच्या माध्यमातून देण्यात आली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे पुनर्वसन, किल्लारी भूकंपातील मुलांचे पुनर्वसन असे विविध उपक्रम दाखवण्यात आले. जोहरीवाड्यातील संस्कार महिला मंडळाच्या वतीने किल्लारी भूकंपग्रस्तांना जैन समाजाने केलेल्या मदतीचा देखावा उभा केला होता. ड्यूक अँड लर्नच्या वतीने शाकाहाराचे समर्थन, प्रगती महिला मंडळाच्या वतीने भगवान महावीरांचा जन्मदेखावा, आस्था चॅरिटी ग्रुपच्या वतीने भगवान नेमीनाथांची वरात सजीव देखावा तयार करण्यात आला होता. खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर राजाबाजार यांच्या वतीने अन्नपूर्णा व्हॅन शोभायात्रेत सहभागी झाली होती. कुंथुनाथ दिगंबर जैन मंदिर बालाजीनगर यांच्या वतीने मांगीतुंगीच्या १०८ फुटी मूर्तीचा देखावा, अरिहंतनगरातील आदिनाथ दिगंबर जैन मंदिराने ‘एकता में जीवन’ संदेश देखावा, चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर विष्णुनगरने नवकार मंत्राची महती, नवयुवती दिगंबर जैन महिला मंडळाच्या वतीने त्रिशला माताजी यांना पडलेली १६ स्वप्ने, यामध्ये प्रत्येक महिला एक स्वप्न फलकाच्या माध्यमातून दाखवत होती. पी. यू. जैन विद्यालयाने थोर स्वातंत्र्यसेनानी माणिकचंद पहाडेंचे जीवनदर्शन घडवले. 

शिवाजीनगरातील शांतिनाथ सैतवाल दिगंबर जैन मंदिराच्या वतीने कुंदकुंदाचार्य देव बनल्यानंतर त्यांनी ताडपत्रीवर शास्त्रलेखन करतानाचा सजीव देखावा केला. विमलनाथ जैन पाठशाळेच्या वतीने नवकार महिमा संदेश फलकांतून सांगण्यात आला. महावीर स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने गोसेवा या विषयाकडे लक्ष वेधण्यात आले. चंद्रप्रभू खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर हडको यांच्या वतीने जैन्स फॉर इंडियाच्या माध्यमातून जैन समाजाने संपूर्ण विश्वासाठी केलेले कार्य दाखवण्यात आले. चिंतामणी पार्श्वनाथ सैतवाल दिगंबर जैन मंदिर जैनभवानी नगर यांनी कचनेर तीर्थक्षेत्र तसेच शिखरजी तीर्थक्षेत्राचा देखावा उभा केला होता. 
 
मराठमोळ्या ढोल पथकाने तरुणींनी वेधले लक्ष 
एम-२ येथील मंडळाच्या वतीने मराठमोळ्या वेशातील ढोल पथकातील तरुणींनी दमदार सादरीकरण करत लक्ष वेधले. यासोबत वर्धमान रेसिडेन्सीतील जैन बांधवांनीही तरुणींचे एक ढोल पथक आणले होते. दोन्ही पथकांतील तरुणींनी वादन, वेशभूषा आणि बहारदार सादरीकरणातून वातावरणात जल्लाेष भरला. 
 
सजीव देखाव्यांतून केले समाजप्रबोधन 
भगवानमहावीर यांच्या जन्मोत्सवानिमित्त रविवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सकल जैन समुदाय सहभागी झाला होता. जयंती मिरवणुकीतील सर्वच देखावे सुंदर आणि आकर्षक तर होतेच शिवाय समाज प्रबोधन करणारे होते. बेटी बचाव, जिओ और जिने दो, दहशतवाद थांबवा, शहर सुंदर स्वच्छ ठेवा आदी सजीव देखाव्यांनी मिरवणुकीत सहभागी भाविकांचे लक्ष वेधले. 
 
मिरवणुकीतील क्षणचित्रे
या वेळी अॅम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले. 
- सुभाष झांबड यांच्या रॉयल ग्रुपच्या वतीने लाख वृक्षारोपणाचा संकल्प घेण्यात आला.
शोभायात्रेतील प्रत्येकाला एक वृक्ष रोपणासाठी देण्यात आला. जगवण्याची शपथही देण्यात आली. 
- कचरा वर्गीकरण करून शहर कचरामुक्त करण्यासाठी सखोल माहिती अग्रवाल दिगंबर जैन महिला मंडळाने भित्तिपत्रक, व्हिडिओ, देखाव्यातून दिला. 
- कुंडलीआधी थॅलेसेमियाची चाचणी जुळवून पाहा. यामुळे थॅलेसेमिया या गंभीर आजारापासून पिढी वाचेल असा संदेश संगिनी महिला मंडळाने दिला. 
- पद्मनेमी दिगंबर जैन धर्मवर्धन संस्था विनीता जैन पाठशाळेच्या वतीने मुलांना मोबाइल देऊ नका, यातून ती नैराश्याकडे ढकलली जातील हा मोलाचा संदेश देण्यात आला. 
 
राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा 
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अहिंसा, सत्य, करुणा याबाबत भगवान महावीरांनी शिकवलेलं तत्वज्ञान आजही समाजाला उपयोगी असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेसबुकवरुन महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या संदेशात ते म्हणाले, की भगवान महावीरांचा संदेश प्रत्येक पिढीसाठी महत्वाचा आहे.
 
पुढील स्लाइडमध्ये वाचा, सजीव देखाव्यांतून केले समाजप्रबोधन आणि मिरवणुकीतील फोटो आणि VIDEO...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...