आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahavitaran Clutter,latest News In Divya Marathi

भारनियमनाबाबत माहावितरणचा गोंधळ, आता कोळसा व गॅस तुटीची सबब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- सोमवारी (29 सप्टेंबर) राज्यात 16 हजार 300 ते 16 हजार 400 मेगावॅट इतकी विक्रमी वीज उपलब्ध असल्याचे सांगणा-या महावितरणच्या अधिका-यांनी बुधवारी (1 ऑक्टोबर) मात्र कोळसा आणि गॅस पुरवठ्याच्या तुटीमुळे व महापारेषणच्या पडघा उपकेंद्रात झालेल्या बिघाडामुळे भारनियमन करण्यात येत असल्याचे सांगितले.
राज्यात पुरेशी वीज उपलब्ध आहे की नाही यावरून खुद्द महावितरणचाच गोंधळ उडत असल्याचे मागील तीन दिवसांतील घडामोडींवरून स्पष्ट झाले. विजेच्या मागणीत वाढ झाल्यामुळे राज्यात विजेची टंचाई जाणवत आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने वीज खरेदीबाबतचा निर्णय घेणारे कोणी नसल्याने भारनियमनाचे संकट ओढवल्याचे अधिकाऱ्यांनी म्हणणे आहे.
नवरात्रोत्सवात (25 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर) भारनियमन करण्यात येणार नाही, असे महािवतरणने जाहीर केले होते. मात्र, 26 सप्टेंबरपासून मार्केट यार्ड फीडर वगळता सर्व भागात दोन टप्प्यांत पाच ते सहा तासांचे, तर मंगळवारी (30 सप्टेंबर) संपूर्ण राज्यभरात अ, ब, क, ड, ई, फ, ग-१, ग-2 आणि ग-2 या सर्व गटांत भारनियमन करण्यात आले.
16 हजार 300 ते 16 हजार 400 मेगावॅट इतकी विक्रमी वीज उपलब्ध आहे. मात्र, फ्रिक्वेन्सी कमी झाल्याने भारनियमन करावे लागते, असे सोमवारी (29 सप्टेंबर) सांगणाऱ्या महावितरणने बुधवारी (1 ऑक्टोबर) मात्र कोळसा व गॅसच्या पुरवठ्यातील तुटीमुळे रोज सुमारे दोन हजार मेगावॅट वीज कमी मिळत आहे, अशी सबब सांगितली. महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पातून साडेपाच हजार मेगावॅट विजेची अपेक्षा असताना केवळ चार ते साडेचार हजार मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. त्यामुळे भारनियमन करावे लागत आहे, असे पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, ऐन नवरात्रात भारनियमन केल्याने नागरिकांमध्ये महावितरणबद्दल संतापाची भावना आहे. ही परिस्थिती आणखी किती दिवस सुरू राहील याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना ठामपणे सांगता येत नाही.

थोडा दिलासा...
मंगळवारी व बुधवारी अ, ब, क, ड, ई, फ, ग-1, ग-2 आणि ग-2 या सर्व गटांमध्ये भारनियमन करण्यात आले. परिस्थितीत सुधारणा झाल्याने गुरुवारी अ ते ग-1 गटापर्यंत भारनियमन रद्द करण्यात आले होते. ही परिस्थिती लवकरच आटोक्यात येईल. दत्तात्रेय कोळी, अधीक्षक अभियंता.