आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरण-जीटीएलच्या भांडणात बळीराजाचे नुकसान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चिकलठाणा भागात अजूनही चांगली बागायती शेती पाहायला मिळते. या ठिकाणी भाजीपाल्याचे पीक घेतले जाते. येथील फुलकोबी अन् कांदा प्रसिद्ध असून तो येथून थेट विदर्भात विक्रीसाठी नेला जातो. पूर्वीपासून चिकलठाणा गाव पालेभाज्यांसाठी प्रसिद्ध आहे. आता हे गाव औरंगाबाद शहराच्या हद्दीत आले असले तरी विमानतळ ते केंब्रिज शाळा हा परिसर आता सिमेंटच्या जंगलाने व्यापला आहे, तेथे गावात कैलास रिठे हा अवघ्या 24 वर्षांचा तरुण शेतकरी बागायती शेती करतोय. तीन भावंडे मिळून त्यांची 18 एकर शेती आहे. विमानतळासमोर केंब्रिज शाळेच्या अगदी मागचा हा भाग आहे. तेथे त्याने शंभर फूट खोल विहीर खोदली. विहिरीला भरपूर पाणी लागल्याने त्याने ती सिमेंटने बांधून काढली. तब्बल साडेपाच लाख रुपये खचरून त्याने विहीर बांधली व सीताफळाची बागही लावली. आता भरपूर पीक येईल या आशेवर त्याने इलेक्ट्रिक कनेक्शन घेण्याचा निर्णय घेतला आणि येथेच त्याच्या हलाखीला सुरुवात झाली.

विजेसाठी पळापळ

कैलास रिठे यांनी मोटर बसवून विहिरीतले पाणी शेतात घ्यावे या उद्देशाने वीज जोडणी घेण्यासाठी 21 सप्टेंबर 2012 रोजी पहिला अर्ज सादर केला. महावितरणने स्थळ पंचनामा करून हा परिसर आमच्या अखत्यारीत येत नसल्याचे त्याला लेखी कळवले. त्यामुळे 15 ऑक्टोबर 2012 रोजी त्याने जीटीएलकडे अर्ज केला, जीटीएलचे अधिकारी अविनाश अग्निहोत्री यांनी सर्वेक्षणही केले, पण पोल टाकावे लागणार असल्याने कनेक्शन देण्यास उशीर होत असल्याचे त्यांनी रिठे यांना सांगितले. त्यामुळे त्याने स्वखर्चाने पोल टाकण्याची तयारी दाखवली. तसा बाँडही जीटीएलला दिला. हे प्रकरण पुढे वीज जोडणी अधिकारी सुशांत मुर्तडक यांच्याकडे गेले. त्यांनी चार महिन्यांनंतर दिलेले उत्तर चमत्कारिक होते. ते म्हणाले, या वाहिनीवर आमचा एकच ग्राहक आहे. त्याच्याकडे वीज बिल थकल्याने ही लाइनच आम्ही काढून टाकणार आहोत. त्यामुळे वीज मिळणार नाही.

उत्तरात विरोधाभास

जीटीएलच्या अधिकार्‍यांच्या बोलण्यात आणि लेखी उत्तरात प्रचंड विरोधाभास रिठे यांना जाणवला. त्यांना वीज कनेक्शन का नाकारले याचा खुलासा अत्यंत तांत्रिक भाषेत करण्यात आला आहे. शेवटी तुमचे शेत ग्रामीण भागात येत असल्याने ते आमच्या हद्दीत येत नाही. त्यामुळे आम्ही असर्मथ आहोत, असे लेखी पत्र रिठे यांना जीटीएलच्या मालमत्ता विभागाच्या व्यवस्थापकांनी दिले.


दोघांच्या भांडणात माझे नुकसान झाले
आमचा व्यवसाय शेती हाच आहे. चिकलठाणा हा भाग शहरी भागात जीटीएलच्याच अखत्यारीत येतो, पण महावितरण अन् जीटीएलच्या हद्दीच्या वादात माझे मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले. विहिरीचा साडेपाच लाखांचा खर्च, सीताफळाचे एक लाखाचे पीक जऴून गेले. मी वारंवार चकरा मारून थकलो, पण महावितरण व जीटीएलचे अधिकारी माझा प्रश्न सोडवण्यास तयार नाहीत.
कैलास रिठे, शेतकरी, चिकलठाणा


जॉइंट सर्व्हे करावा लागेल
या जागेचा मला जॉइंट सव्र्हे करावा लागेल. कारण जीटीएल आणि महावितरणमध्ये हद्दीवरून वाद आहे. जेथे सीमा भाग आहे तेथे अनेक ठिकाणी अशी गैरसोय होत आहे. छावणी, पडेगाव, चिकलठाणा आणि वाळूज या ठिकाणी असे वाद आहेत. यातून आम्ही तोडगा काढत आहोत. या प्रकरणात मी स्वत: लक्ष घालतो. महावितरणसोबत जॉइंट सव्र्हे घेऊन प्रकरण निकाली काढतो. मला फक्त दोन दिवस द्या.
जगदीश चोलरमनी, व्यवसाय व तांत्रिक विभाग प्रमुख,जीटीएल


सर्वेक्षण करून निर्णय घेणार
औरंगाबाद शहराचा ग्रामीण विभाग माझ्या अखत्यारीत येत असला तरी मी सर्व बाबी विचारात घेतल्याशिवाय कुठलीही कारवाई करू शकत नाही. मला या जागेची स्थळ पाहणी करावी लागेल. त्यानंतर सर्वेक्षण करूनच निर्णय घ्यावा लागेल.
चंद्रकांत हुमने, कार्यकारी अभियंता, महावितरण