आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mahavitaran Starts Collection In Vaijapur Taluka

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैजापूर तालुक्यात वीज बिल वसुलीसाठी महावितरणचा धडाका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर - थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने धडक मोहीम हाती घेतली असून वैजापूर तालुक्यातील 569 कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली. भीषण दुष्काळाने होरपळलेल्या शेतकर्‍यांच्या जखमेवर महावितरणने मीठ चोळल्यामुळे प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. पिके ऐन बहरात असताना या कारवाईमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

वैजापूर तालुक्यात राज्य विद्युत महावितरण कंपनीची दोन विभागीय क्षेत्रे आहेत. या क्षेत्रांतील एकूण 10 युनिटमधील 34 हजार कृषिपंप ग्राहकांकडे 106 कोटी रुपयांची विजेची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतल्यामुळे शेतकरीवर्गात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या वर्षात दुष्काळाच्या भीषण परिस्थितीच्या कठीण झळा सोसल्यानंतर चालू हंगामातही पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अस्मानी संकट घोंगावत असतानाच ‘महावितरणची वीज शेतकर्‍यांच्या मुळा’वर कोसळली आहे. त्यामुळे कृषिपंपाचे बिल भरायचे कोठून, या विवंचनेत शेतकरी आहेत. तालुक्यातील दोन्ही उपविभागांतील 34 हजार कृषिपंपधारक शेतकरी ग्राहकांकडून कुठल्याही परिस्थितीत वीज बिलाची रक्कम वसूल करा, अन्यथा कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करा, असा फतवाच विद्युत महावितरण कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाकडून धडकला आहे. त्यामुळे दोन्ही उपविभागांतील सहायक अभियंत्यानी 569 कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. दरम्यान, उपविभाग क्रमांक एकमध्ये 120 कृषिपंप ग्राहकांनी वीज बिल वसुली मोहिमेला प्रतिसाद देऊन 5 लाख रुपयांचा भरणा केल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली, असे सहायक अभियंता के. एस. रंधे यांनी सांगितले.


मोहीम प्रभावीपणे राबवू
एप्रिल 2012 ते जून 2013 या काळातील 5 विद्युत देयकांची रक्कम महावितरण कार्यालयाकडे जमा केल्यास ही कारवाई टळू शकेल. येत्या काही दिवसांत वसुली मोहीम युनिट क्षेत्रात प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. के. एस. रंधे, सहायक अभियंता


शेतकरीविरोधी मोहीम हाणून पाडू
शेतकरीविरोधी सरकारने थकीत वीज बिल भरण्याचा तगादा त्वरित थांबावा, अन्यथा शिवसेना आपल्या स्टाइलने आंदोलन करून ही मोहीम बंद पाडेल. प्रा. रमेश बोरनारे, तालुकाप्रमुख, शिवसेना

78 गावांतील शेतकर्‍यांकडे बाकी
ग्रामीण उपविभागीय क्रमांक एकअंतर्गत वैजापूर शहर, परसोडा, महालगाव, नागमठाण, शाखा कार्यालय एक व दोन अशा सहा युनिटमधील 78 गावे येतात. या गावांतील 18 हजार 781 कृषिपंपधारक ग्राहकांकडे 67 कोटी रुपयांची थकबाकी आहे.