आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीटीएलपासून मुक्ती, पुन्हा ‘महावितरण’!, १७ तारखेपासून महावितरणचा वीजपुरवठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जीटीएलचा करार रद्द करण्याची कारवाई पूर्ण झाली असून १७ नोव्हेंबर २०१४ रोजी रात्री शहरातील वीज पुरवठ्याचे काम महावितरण पुन्हा हाती घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे जीटीएलच्या मनमानीला कंटाळलेल्या लाखो वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जीटीएल कंपनीने महावितरणकडून १ मे २०११ रोजी शहराच्या वीज पुरवठ्याचे काम हाती घेतले होते. त्यानंतर जीटीएलने १ लाख ३० हजारांपेक्षा अधिक वीज मीटर टेस्टिंगविना बसवल्याचे राज्य नियामक आयोगाचे ग्राहक प्रतिनिधी हेमंत कापडिया यांनी माहितीच्या अधिकारातून उघड केले आहे. लोंबकळणाऱ्या विद्युतवाहिन्या, रस्त्यातील खांब, उघड्या डीपी यामुळे अनेक जण त्रस्त होते. जीटीएल हटावसाठी तीन वर्षांत पंधरा हजारांहून जास्त तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

महावितरण येणार ही बाब आनंदाची असली तरी जीटीएलच्या १ हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात जाणार आहे. कारण महावितरण कमी कर्मचारी आणि स्वबळावर शहर वीज वितरणाची जबाबदारी घेणार आहे.

महावितरण चांगल्या पद्धतीने काम करत होती. पण अचानक जीटीएलकडे कारभार देण्यात आला. मात्र त्यांनी उद्दिष्टालाच गालबोट लावले. हा सर्व संघटनांचा विजय आहे, असे म. वि. का. म.चे विभागीय अध्यक्ष अरूण पिवळ यांनी सांगितले.

१५ वर्षांचा करार, ३ वर्षांत संपुष्टात
जीटीएलकडे ३९६ कोटी थकले आहेत. नोटीस देऊनही भरणा न केल्यामुळेे १० नोव्हेंबर रोजी करार रद्द करण्याची अंतिम नोटीस बजावली आहे. १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ००.०० वाजेपासून महावितरण शहर वीज वितरणचा कारभार हाती घेणार आहे.
नियम धाब्यावर जीटीएलला कंत्राट
२००३ च्या वीज कायद्यानुसार शहरात ज्या ठिकाणी वीज बिलाची वसुली, गळती आदी बाबी सोप्या आहेत, अशा ठिकाणी फ्रँचायझी देता येत नाही. पण शहरात सर्व नियम धाब्यावर बसवून जीटीएलकडे वीज पुरवठ्याचा कारभार देण्यात आला होता.
कानपूर पॅटर्न
सर्व संघटनांनी कानपूरच्या धर्तीवर जीटीएल हटवण्याची मागणी केली होती. सरकारने ती मान्य केली आहे. वीज ग्राहकांना चांगल्या सेवेसाठी बांधील आहोत. - बालमुकुंद सोमवंशी, एआयपीईएफ