आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद महापालिकेची दिवाळखोरी, शहर अंधारात; महिलांची छेडछाड - भुरट्या चोऱ्या वाढल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या महापालिकेच्या तिजोरीत पैसाच नसल्याने नागरिकांना मोठा फटका बसत आहे. बिलाच्या थकबाकी वसूलीसाठी महावितरणने ७०० पथदिव्यांची वीज कापली. दुसरीकडे महापालिका तोटा भरून काढण्यास तयार नसल्याने सिटी बस सेवाही बंद होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, बाजारात अंधाराचा फायदा उठवत भामटे महिलांची छेडछाड करत असून चोरटे मोबाइल लंपास करत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत.

पथदिव्यांमुळेच सुरक्षितता असते. हे दिवे सुरू ठेवण्यासाठी महावितरणला दरमहा वेळेत बिल देण्याची जबाबदारी मनपाची आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येताच महावितरणने शुक्रवारी ३०० तर शनिवारी ७०० पथदिव्यांची वीज कापली. यामुळे सिडको, चिकलठाणा, मुकुंदवाडी, रामनगर, विठ्ठलनगर, सेव्हन हिलचा उड्डाणपूल यासह शहरातील अनेक सर्वत्र काळोख पसरला आहे. दरम्यान, शहरात एसटी महामंडळाकडून चालवली जाणारी बस सेवा महापालिकेमुळेच बंद होण्याच्या मार्गावर आहे. सध्या ११ मार्गांवर बस सुरू असून प्रवासी नसल्याने १६ कोटींचा तोटा झाला आहे. बस चालवण्याची मूळ जबाबदारी महापालिकेची आहे. ती पार पाडली जात नाही. तर किमान तोटा तरी भरून काढावा, असे महामंडळाचे म्हणणे आहे. मात्र, तिजोरीत पैसा नाही, असे आयुक्त ओमप्रकाश बकोरियांनी सांगितल्याने ही सेवा बंद करण्याच्या दिशेने पावले पडत आहेत. 
 
मनपा, थकबाकीदार महावितरणच्या वादात नियमित वीज बिलाचा भरणा करणाऱ्या सव्वा लाखांवर ग्राहकांना शहरवासीयांची नाहक ससेहोलपट होत आहे. 

महावितरण परिमंडळातील सुमारे १० लाख वीज ग्राहकांना वीजपुरवठा करते. एक युनिट वीज ग्राहकांच्या घरापर्यंत घेऊन जाण्यासाठी साडेसहा रुपये खर्च येतो. ग्राहकांना युनिटच्या वापरानुसार दर आकारला जातो. तरीदेखील निम्म्यापेक्षा अधिक ग्राहक वीज बिलाचा भरणा करत नाहीत. यामध्ये घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक, कृषी, पाणीपुरवठा, मनपा, शासकीय कार्यालये, संस्थांचा समावेश आहे. असे किती दिवस चालायचे? प्रत्येक युनिटची रक्कम वसूल करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. 

यांचीही वीज कापली:
जालना शहरातील संपूर्ण पथदिवे घनसावंगी तालुक्यातील मुडेगाव, घोणसी, घोणसीतांडा, निपाणी, पिंपळगाव, साकळगावचा वीजपुरवठा खंडित केला आहे. वाघ्रुळा, जालना पोलिस स्टेशन इन्सेलेव वायरलेस विभाग, शहर पाणीपुरवठा योजना, अंबड पाणीपुरवठा योजना, घनसावंगी पाणीपुरवठा योजना, औरंगाबाद ग्रामीणमधील ३८३ थकबाकीदारांचा १८ लाख ७९ हजार थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. २४१ वीज ग्राहकांकडून लाख ७३ हजार वसूल करण्यात आले. 

पोलिसही त्रस्त: पथदिवेबंद असल्याने पोलिसही त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी गस्तीवर असणाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पोलिस उपायुक्त संदीप आटोळे म्हणाले की, पथदिवे बंद असल्याने रस्त्यावरील अपघाताचे प्रमाणही वाढते. वीज नसल्याने सिग्नल यंत्रणेवरही परिणाम होतो. याबाबत संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केला जाणार आहे. 

मनपामुळे त्रास: पथदिव्यांचे बिल भरण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, ती पाळली जात नसल्याने महावितरणने पथदिवे बंद करून टाकले आहेत. म्हणजे चूक महापालिकेची आणि त्रास सामान्य नागरिकांना अशी परिस्थिती उद्भवली आहे. 
  
सध्या पैसाच नाही 
सध्या मनपाच्या तिजोरीत महावितरणचे पथदिव्यांचे बिल भरण्यासाठी पैसाच नाही. राज्य शासनाकडून एलबीटीची रक्कम आल्यावर बिल देऊ. त्यासाठी काही काळ थांबावे लागेल, असे मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरियांनी सांगितले. 

महिलांशी छेडछाड, मोबाइल चोरीचा प्रकार रामनगर भाजीमंडईत घडला आहे. मनपा महावितरणच्या वादात नागरिकांची नाहक ससेहोलपट होत आहे
- मनोज गांगवे, नगरसेवक,विठ्ठलनगर. 
 
पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समधून जाणून घ्या किती थकले बिल... 
बातम्या आणखी आहेत...