आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहेश्वरी बहू मंडळाच्या वतीने खेळ, तीजच्या गाण्यांवर जल्लोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- माहेश्वरी बहू मंडळाच्या वतीने रंगारगल्ली येथील महेश भवनात श्रावणातील पहिला सण ‘तीज-सिंजारा’ उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक तीजच्या गीतांनी भगवान शंकराला साकडे घालत महिलांनी पतिराजाच्या दीर्घायुष्याची कामना केली. विविध खेळ आणि श्रावणगीते, पारंपरिक गाण्यांनी कार्यक्रमात जल्लोष भरला. 30 जुलै रोजी झालेल्या छोटी तीजपासून 13 ऑगस्टला होणाºया मोठ्या तीजपर्यंत हा उत्सव विविध ठिकाणी साजरा केला जातो. माहेश्वरी समाजामध्ये ‘तीज-सिंजारा’ सणाचे विशेष महत्त्व आहे. व्यापारासाठी बाहेरगावी गेलेला पती या काळात परत येत असे. त्यांची आतुरतेने वाट पाहणारी पत्नी भगवान शंकराची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असे. उपवास करणे, गायनातून भगवंताची स्तुती करणे आणि धार्मिक विधी मनोभावे करून हा उत्सव साजरा केला जातो. महिला गटागटाने एकत्र येऊन मेंदी काढणे, गाणी म्हणणे, खेळ खेळणे असे त्या वेळी करत. ही परंपरा आजच्या काळातही तितक्याच उत्साहाने जोपासली आहे.
मंडळाच्या अध्यक्षा अर्चना तोष्णीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्रावणाची हिरवाई लक्षात घेता हिरवा रंगाच्या परिवेशात महिला सहभागी झाल्या होत्या. श्रावणगीतांनंतर तीजची गाणी झाली. हौजी खेळाने सर्वांमध्ये उत्साह भरला. आनंदाच्या वातावरणात झालेल्या या स्पर्धेनंतर प्रश्नोत्तरांचाही खेळ घेण्यात आला.कांचना सोनी, स्मिता सोनी, स्मिता झंवर, चित्रा राठी आणि मीना सोनी यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अरुणा कचोलिया, रेखा तोतला, दीपाली कलंत्री, कल्पना लोहिया, संगीता माहेश्वरी, मंगल तोष्णीवाल, शीतल सारडा, दीपिका बांगड, राजश्री मंत्री यांनी सहकार्य केले.
तिरंगा रांगोळी, तिरंगा ड्रेसिंग, तिरंगा बांगडी डेकोरेशन आदी स्पर्धा 23 ऑगस्टला महेश भवनात होणार असल्याचे अध्यक्षा तोष्णीवाल यांनी सांगितले. विजेत्यांना आकर्षक बक्षीसही देण्यात येणार आहे. देशभक्तिपर गीतांच्या साथीने होणारा हा उत्सव प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अधिक माहितीसाठी तोष्णीवाल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
नाटिकेने वेधले लक्ष
नव्या पिढीला अनेक सण कसे साजरे केले जातात याची माहिती नाही. सासू नववधूला सण साजरे करण्यास सांगते; परंतु सून भलतेच काही करते. यातून उडालेला गोंधळ नाटिकेतून सादर करण्यात आला. यातून निर्माण झालेल्या विनोदाने सर्वांना खळखळून हसवले.