आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंधने घालण्याऐवजी गुन्हेगारांना फाशी द्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - देशात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण आता वाढले आहे असे नाही, तर पूर्वीही गँगरेपसारखे गुन्हे सातत्याने घडत होते. मात्र, तेव्हा तक्रार दाखल होत नव्हती. त्या काळी माध्यमेही इतक्या वेगाने अशा गुन्ह्यांकडे पाहत नव्हती. आता परिस्थिती बदलली असून तक्रार दाखल होताच माध्यमांची त्यावर नजर असते. अशा वेळी मुलींनी बुरख्यात राहावे किंवा त्यांच्यावर बंधने लादावीत असे म्हटले जाते. पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे असे गुन्हे करणार्‍यांना सहा महिन्यांच्या आत फाशीवर लटकवायला हवे, अशा शब्दांत सिनेअभिनेत्री महिमा चौधरी हिने संताप व्यक्त केला.

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात आली असता तिने विविध विषयांवर ‘दिव्य मराठी’शी बातचीत केली. 1997 ला सुभाष घईंच्या ‘परदेस’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर आगमन केलेल्या महिमा चौधरीने 2006 मध्ये लग्न करून चित्रपटांना रामराम ठोकला. त्यानंतर ‘प्यार कोई खेल नहीं’, ‘दिल क्या करे’, ‘कुरुक्षेत्र’, ‘ओम जय जगदीश’सारख्या बड्या बॅनरच्या चित्रपटात काम केलेल्या महिमाने आमिर खान आणि ऐश्वर्या रॉयसोबत पेप्सीच्या जाहिरातीतून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. ‘तेरा घर ये मेरा घर’सारख्या चित्रपटातून आपला अभिनय तिने दाखवून दिला. मात्र, करिअरचा ग्राफ चांगला सुरू असतानाच विवाह करून चित्रपटांपासून संन्यास घेतला.

जबाबदारीमुळे चित्रपटांपासून लांब
महिमा म्हणाली, चित्रपटांत येताना घई यांना म्हणाले होते की, तीन वष्रे काम करणार आहे. तर ते म्हणाले तू किमान पाच वष्रे तर नक्कीच काम करशील, पण नशिबाने साथ दिली आणि मी दहा वष्रे चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. त्यानंतर लग्न केले आणि मुलांची जबाबदारी आल्याने चित्रपटांपासून लांब गेले. आता सध्या ‘मुंमभाई-द-गँगस्टर’ या चित्रपटात काम करत आहे.

मला वाटले ते केले
महिमा म्हणाली, अभिनयाच्याच क्षेत्रात जाण्याचा ध्यास घेऊन काही केले नाही. मनाला जे आवडेल, मानवेल ते करत गेले. त्यामुळे जाहिरातीतून चित्रपटांमध्ये आले. विवाह केल्यानंतर मला सामाजिक आयुष्य जगायचे होते. मग मी चित्रपट थांबवले.

‘गंगा’ने प्रसिद्धी दिली
आवडत्या भूमिकेविषयी बोलताना ती म्हणाली, माझ्या भूमिकांपैकी सरस्वती ही माझी आवडती भूमिका आहे, तर परदेसमधील गंगाने मला प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहचवले.

हा संदेश द्यावा
महिलांवर अत्याचार करणार्‍यांना कुठल्या शिक्षा दिल्या जातात हे चित्रपटगृहांत दाखवावे. मुलींवर बंधने घालण्याऐवजी मुलांवर संस्कार करणे, कायद्याने नियंत्रण आणणे गरजेचे आहे, असे महिमा म्हणाली.