आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहरात मकरसंक्रांतीच्या तिहेरी मुहूर्ताचा उत्साह

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ब-याच वर्षांनंतर संक्रमणकाळात प्रथमच उत्तरायणात असलेला सूर्य आणि स्वार्थसिद्धी, अमृतसिद्धी व रवी योग आदी योगांचा अद्वितीय त्रिवेणी संगम आज जुळून आला आणि याचकांना दानधर्म करत हजारो महिलांनी मकरसंक्रांत अत्यंत उत्साहात साजरी केली. मांगल्याचे पहिले वाण परमेश्वराला वाहण्यासाठी महिलांनी अलोट गर्दी केल्याने शहरातील मंदिरे रविवारी गर्दीने फुलून गेली होती.
सकाळपासूनच शहरातील गजानन महाराज मंदिर, खडकेश्वर मंदिर, संस्थान गणपती आदी देवस्थानांत पहिले वाण वाहण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. पूजेच्या साहित्याची खरेदी करतानाची लगबग अवर्णनीय होती. यंदाची संक्रांत 28 वर्षांनंतर आलेली आहे. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच सूर्य उत्तरायणात असताना संक्रांत सण आला आहे. तीन शुभ योग एकाचवेळी जुळून आल्याने दानपुण्य पदरात पाडून घेण्यासाठी कित्येक जणी दानकर्मात व्यग्र दिसत होत्या. यामुळे मंदिराबाहेरील याचकांची (भिकारी) चांगलीच चंगळ दिसत होती.
यापुढे 17 तारखेला येईल संक्रांत! - ज्योतिष विशारद यशवंत मंगीरवार म्हणाले, ग्रहांच्या गतीतील(अयनांश) बदलामुळे मकरसंक्रांतीच्या तारखेत बदल होतो. अयनांशांची गती सुमारे 72 वर्षांत 60 कला 1 अंशाने म्हणजेच 1 दिवसाने वाढते. 17 व्या शतकात मकरसंक्रांत 9 किंवा 10 तारखेला साजरी होत असे, तर 18 व्या शतकात 11 किंवा 12 तारखेला ती येत होती. 19 व्या शतकात ती 13 किंवा 14 तारखेला साजरी केली जाऊ लागली. विसाव्या शतकात कधी 14, तर कधी 15 तारखेला येत असे. 21 आणि 22 व्या शतकात काही वर्षी 14, 15, 16 तर काही वेळा 17 तारखेला ती येणार आहे.
असे होतील राशीवर परिणाम! - मेष-कार्यसिद्धी, वृषभ-धर्मलाभ, मिथुन-कष्ट, सिंह-विवाद, कन्या-यश, तूळ-कलह, वृश्चिक-लाभ, मकर-यश,धनू-आनंद, कुंभ-हानी आणि मीन-लाभ अशा पद्धतीने राशींवर ही संक्र्रांत प्रभाव टाकील. - रोहिणी कुलकर्णी, ज्योतिषी