आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी निवडणुकीची - शिवसेना, भाजपकडून अनेकांना कामाला लागण्याचे निर्देश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगर पालिकेची निवडणूक कधी होणार हे अजून अनिश्चित असले तरी काही वाॅर्डांत पक्षनेत्यांनी काही जणांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असला तरी यामुळे काही जण कमालीचे नाराज झाल्याने अधिकृत उमेदवारी मिळेपर्यंत इच्छुकांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेने काही उमेदवार निश्चित केले आहेत. त्यापाठोपाठ काही वाॅर्डांत भारतीय जनता पक्षानेही काही जणांना कामाला लागण्याची सूचना केली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार अजून निश्चित नसले तरी त्यातील काही जण आपणहून कामाला लागले आहेत.

सेनेकडून अनेकांना संकेत

शिवसेनेच्या वतीने निवडणुकीची तयारी करत असताना युती होईल, असे गृहीत धरण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वी शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या वाॅर्डांत कोण लढणार याची अटकळ नेत्यांना आली आहे. त्यातील काहींना योग्य ते संकेत देण्यात आले आहेत.
शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मीच ठरवणार, असे आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले असून त्याला अन्य पदाधिकाऱ्यांनीही आक्षेप घेतलेला नाही.

अन्य विधानसभा मतदारसंघांतील उमेदवार निश्चिती ज्याला करायची त्याने करावी, मी काहीही म्हणणार नाही, पण पश्चिममधील उमेदवार मीच ठरवणार, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य व पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महानगरप्रमुख तथा माजी आमदार प्रदीप जैस्वाल हे ठरवणार आहेत.
भाजपची अंतिम यादी दानवेंच्या नजरेतूनच

भारतीय जनता पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाचे उमेदवार ठरवण्याचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार असले तरी अंतिम यादी ही प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची नजर फिरल्यानंतरच समोर येणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचीही या यादीवर नजर असेल, परंतु अंतिम यादी दानवे यांच्याकडूनच येणार आहे.
गतवेळीही उमेदवार ठरवताना दानवे यांनी हस्तक्षेप केला होता. त्यांच्या मतदारसंघात पालिका हद्दीतील १२ वाॅर्ड येतात, म्हणून त्यांनी येथील राजकारणात चंचुप्रवेश केला असून त्यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळेलच, असा दावा करण्यात येत असून अनेकांनी आतापासून दानवे यांच्याशी सलगी वाढवण्याचा प्रयत्न चालवला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीचे अजून अस्पष्ट

शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली असली तरी काँग्रेस व राष्ट्रवादीचे अजून काहीही ठरलेले नाही. दोन्ही पक्षांत आघाडी होईल की नाही, झाल्यास उमेदवारी कोण निश्चित करणार हे अजून ठरलेले नाही. एमआयएमच्या लाटेमुळे हे दोन्हीही पक्ष अस्वस्थ असून ऐनवेळी काय ठरायचे ते ठरेल, असे सूत्रांकडून सांगण्यात येते.