आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत मलेरिया, न्यूमोनिया, डेंग्यू, गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील बहुतांश रुग्णालयांमध्ये डेंग्यू आणि डेंग्यूसदृश रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये ग्रामीणपेक्षा शहरातील रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. फ्लू, व्हायरल न्यूमोनिया, मलेरिया, दमा, ब्राँकायटिसचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. लेप्टोस्पायरोसिस (लेप्टो) लहान मुलांमध्येही दिसून येत आहे. मात्र, लेप्टोचे रुग्ण शहराबाहेरचे आहेत. स्वाइन फ्लूमुळे आठ महिन्यांत आठ जाणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

ऑगस्टपासून डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत हे प्रमाण वाढले आहे. लहान-मोठय़ांमध्येही डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने वेगवेगळ्या रुग्णालयांतील वैद्यकतज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता जवळपास प्रत्येक छोट्या-मोठय़ा रुग्णालयांत काही ना काही प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत असल्याचे चित्र आहे. यामध्ये 40 टक्के रुग्ण शहरी भागातील आहेत.

‘धूत’, ‘अमृत’मध्ये लेप्टोचे रुग्ण
सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये महिनाभरात तीन लेप्टोस्पायरोसिसचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यासंदर्भात मेडिसिन विभागप्रमुख व वरिष्ठ चिकित्सक डॉ. विवेक तडवळकर म्हणाले, महिन्यापासून गंभीर गुंतागुंत व ‘मल्टिऑर्गन फेल्युअर’मुळे लेप्टोचे रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. सर्व रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. अमृत बाल रुग्णालयामध्येही परभणीतील एक दहावर्षीय मुलगी लेप्टोस्पायरोसिसच्या उपचारासाठी दाखल होती. याविषयी ‘अमृत’चे बालरोगतज्ज्ञ डॉ. मंदार देशपांडे यांनी लेप्टोची ही या पावसाळ्यातील पहिलीच केस असल्याचे सांगितले. लेप्टोची लक्षणेही डेंग्यूप्रमाणेच असतात. दूषित पाण्याचा त्वचेशी संपर्क होऊन या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. या आजारामध्ये रुग्णाला कावीळदेखील होऊ शकते. त्यामुळे कावीळ, पांढर्‍या पेशी कमी होणे, यकृतावर सूज येणे, ताप येणे अशी लक्षणे आहेत.

प्रत्येक रुग्णालयात ‘डेंग्यू दर्शन’
बहुतांश रुग्णालयांत डेंग्यूचे रुग्ण आहेत. यासंदर्भात बालरोगतज्ज्ञ डॉ. देशपांडे म्हणाले, आमच्याकडे 10 ते 15 डेंग्यूचे पॉझिटिव्ह, तर 30 ते 40 डेंग्यूसदृश रुग्ण आढळले. बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत जाधव यांनी किमान 20-25 पॉझिटिव्ह, तर तेवढय़ाच संख्येने डेंग्यूसदृश रुग्णांवर उपचार केल्याचे सांगितले. बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र खडके यांनीही सध्या तीन रुग्ण दाखल असल्याचे सांगितले. फिजिशियन-इंटेसिव्हिस्ट डॉ. आनंद कुलकर्णी यांनी पंधरा दिवसांत आठ डेंग्यूसदृश रुग्णांवर उपचार केले. फिजिशियन-इंटेसिव्हिस्ट डॉ. समीध पटेल यांनीही तीन रुग्ण दाखल असल्याचे सांगितले.

मोजक्या प्रभागांतच केली जाते औषध फवारणी
शहरात रोगराई पसरू नये, साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवता यावे यासाठी मनपाने संपूर्ण शहरात धूर फवारणी, औषध फवारणी करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे मोजके दहा-बारा प्रभाग वगळता नियमित धूर फवारणी होत नसल्याचे दिसून येते. या कामासाठी मनपाने एक कोटी रुपयांहून अधिक खर्चाची तरतूद केली असली तरी निम्म्या शहरातदेखील व्यवस्थित आणि नियमित फवारणी होत नाही. नाल्यांतील पाण्यांवर मारावयाच्या औषधांच्या बाबतीतही हाच प्रकार घडत असून परिणामी नाल्यांच्या काठांवरील वसाहतींमध्ये साथीचे आजार वाढत आहेत. दोनच दिवसांपूर्वी चिकलठाणा भागातील एका बालकाला डेंग्यू झाल्याचा अहवाल आला. यासंदर्भात नगरसेवक संजय चौधरी यांनी आरोग्य वैद्यकीय विभागावर ठपका ठेवला होता. यासंदर्भात आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयर्शी कुलकर्णी यांनी माहिती देण्याचे टाळले.

‘प्लेटलेट’ची मागणी वाढली
ऑगस्ट महिन्यात प्लेटलेट अर्थात पांढर्‍या पेशींची मागणी दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे. या महिन्यात आतापर्यंत 1100 प्लेटलेट देण्यात आले, तर 43 सिंगल डोनर प्लेटलेट देण्यात आले. यापैकी 80 टक्के प्लेटलेट हे डेंग्यूच्या रुग्णांना देण्यात आले आहेत. इतर काळात दर महिन्याला सरसरी 500 प्लेटलेट लागतात.
-डॉ. महेंद्रसिंह चौहान, प्रमुख, दत्ताजी भाले रक्तपेढी

स्वाइन फ्लूने आठ रुग्णांचा मृत्यू
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत आठ महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूचे 18 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यापैकी आठ रुग्णांचा मृत्यू झाला.
-डॉ. दिलीप पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक.

तीन रुग्णांचा घाटीत मृत्यू
घाटीत दररोज किमान पाच ते सहा डेंग्यूसदृश रुग्ण दाखल होत आहेत. दोन महिन्यांत डेंग्यूने तीन रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या मलेरियाचे रुग्णही वाढले आहेत, अशी माहिती औषधी विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर यांनी दिली. घाटीत 1 जानेवारी ते 26 ऑगस्टपर्यंत 46 स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण आढळले. त्यातील चार रुग्ण पॉझिटिव्ह होते आणि त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. सध्या तीन संशयित रुग्ण दाखल आहेत.
-डॉ. पी. एल. गट्टाणी, वैद्यकीय अधीक्षक