आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देखभालीअभावी लाखो पाण्यात, शूलिभंजन पर्यटक योजनेतील मॉल, उद्यानाची दुरवस्था

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - देशविदेशातील पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या खुलताबाद तालुक्यातील वारसास्थळांजवळ अनेक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. पर्यटकांचे लक्ष वेधून घेण्यासह स्थानिक कलाकारांना रोजगार मिळावा यासाठी शूलिभंजन ग्रामीण पर्यटक शॉपिंग मॉल उभारण्यात आला. परंतु देखभालीअभावी या मॉलचे अवशेषच शिल्लक आहेत. या ठिकाणी खास तयार करून घेतलेल्या उद्यानाचीही वाताहत झाली आहे.

तालुक्यात वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणी, म्हैसमाळ येथील व्ह्यू पॉइंट यासह शूलिभंजन येथेही अनेक पर्यटनस्थळे आहेत. खुलताबाद शहरातील औरंगजेब समाधी, भद्रा मारुती मंदिर, जरजरीबक्ष दर्गा आदी वारसास्थळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. या पर्यटनस्थळांमुळे शासनाने हा तालुका पर्यटक तालुका म्हणून घाेषित केला आहे. पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या सोयीसाठी केंद्र तसेच राज्य शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यासाठी कोट्यवधींचा खर्चही हाेत आहे. परंतु योजना कार्यान्वित केल्यानंतर त्याकडे लक्ष न दिल्यामुळे हा खर्च पाण्यात गेला आहे.
खुलताबादेतील एेतिहासिक बनीबाग बेगम येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी शहरातील धरम तलावाजवळ २००४ ते २००५ च्या दरम्यान नगरपालिकेने खुलताबाद शूलिभंजन ग्रामीण पर्यटक योजनेच्या माध्यमातून १० लाख रुपये खर्च करून पर्यटक शाॅपिंग मॉल उभारला. त्याकडे पर्यटक आकर्षित व्हावे यासाठी परिसरात मोठे उद्यान उभारण्यात आले. त्यासाठी पालिकेने किमान १० लाखांचा निधी खर्च केला. या शॉपिंग मॉलमुळे स्थानिकांना रोजगार मिळेल, हस्तकलेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल, या उद्देशाने हा मॉल उभारण्यात आला. मॉल उभारल्यानंतर औरंगाबादेतील निमशासकीय संस्थेला दोन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आला. त्यानंतर दोन ते तीन वर्षे हा मॉल सुरळीत सुरू हाेता. त्यानंतर मात्र पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे मॉलची दुरवस्था झाली. मॉलजवळ घाण, रानटी झुडपे उगवली आहेत. मॉलचे दरवाजे, खिडक्या तुटल्या आहेत.
फोटो - खुलताबाद पालिकेनेही खुलताबाद शूलिभंजन ग्रामीण पर्यटक योजनेच्या माध्यमातून १० लाख रुपये खर्च करून पर्यटक शाॅपिंग मॉल उभारला. मात्र, त्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष न दिल्यामुळे या मॉलसह उद्यानाची वाताहत झाली आहे. छाया : शेख जमीर