आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Malnutrition Child Found In Chttegaon Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्तेगावात चार नव्हे, सहा कुपोषित बालके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- आरोग्य विभाग आणि एकात्मिक बालविकास विभागाच्या वतीने चित्तेगाव (ता. औरंगाबाद) येथील अंगणवाडीची पाहणी केल्यानंतर तेथे चार नव्हे, तर सहा कुपोषित बालके आढळून आली आहेत. अंगणवाडी कार्यकर्तीने सूचना फलकावर चार मुले कुपोषित असल्याचे लिहिले होते. कुपोषित मुलांची माहिती दडवून या अंगणवाडीने शासनाचा आदर्श अंगणवाडी पुरस्कार पटकावल्याचे वृत्त दै. ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केल्यानंतर अंगणवाडी कार्यकर्तीने चार कुपोषित मुलांची नावे जाहीर केली होती.

दै. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने चित्तेगाव येथील अंगणवाडीला भेट दिली असता प्रथम पाहणीत पाच मुले कुपोषित आढळली होती. त्यानंतर अंगणवाडी कार्यकर्तीने चार मुले कुपोषित असल्याची यादी अंगणवाडीत लावली होती. या अंगणवाडीला महिला व बालकल्याण विभागाच्या सीडीपीओ स्नेहा देव आणि आरोग्य विभागातील बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय वाघ यांच्या पथकाने नुकतीच भेट दिली. त्यांना तपासणीसाठी बालके सापडली नाहीत. मात्र, रजिस्टरवरील नोंदींतील खाडाखोडीसह सहा बालके कुपोषित आढळून आली. या बालकांसाठी सोमवारपासून (12 ऑगस्ट) व्हीसीडीसी (ग्राम बालविकास केंद्र) सुरू करण्यात येणार आहे. या अंगणवाडीतील कार्यकर्ती सुटीवर असली तरी जवळच्या अंगणवाडी कार्यकर्तीकडून मदत घेतली जाणार आहे.

कसा दिला जातो आहार

दिवसात पाच वेळा या केंद्रातून आहार देण्यात येतो. दिवसभरात केवळ तीनदा कुपोषित मुलांना घरी जेवण देण्यात येते. सकाळी आठ वाजता मुलांना अमायलेजयुक्त पिठाचा उपमा किंवा शिरा देण्यात येतो. दहा वाजता नियमित आहारात जास्तीचे तेल अथवा तूप टाकून कॅलरीज देण्यात येतात. 12 वाजता पुन्हा असाच आहार देण्यात येतो. दुपारी दोन वाजता मुलगा घरी गेल्यानंतर घरचे जेवण देणे आवश्यक आहे. पुन्हा चार वाजता अंगणवाडीत अथवा व्हीसीडीसी केंद्रात आल्यावर त्याला सकाळी देण्यात आलेल्या अमायलेजयुक्त पिठाचा उपमा किंवा शिरा देण्यात येतो. सहा वाजता एक उकडलेला बटाटा, अंडे आणि एक केळी देण्यात येते. सात दिवस हिमोग्लोबिनच्या गोळ्या देण्यात येतात. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या सूचनेप्रमाणे इतर औषधेही देण्यात येतात.