आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नात अक्षता टाकण्यापूर्वीच नवरदेवाच्या वडिलांचा मृत्यू, फर्दापूर येथील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फर्दापूर - दोन दिवसांपासून लग्नानिमित्त घरी आलेल्या पाहुणे मंडळींचा राबता, आनंदाच्या भरात जे हाती पडेल ते काम करण्यासाठी सर्वांची सुरू असलेली धावाधाव, लगीनघाई सुरू होती. मात्र, क्षणार्धात नवरदेवाच्या पित्यावर काळाने झडप घातल्यामुळे कुटुंबासह वऱ्हाडींच्या आनंदावर विरजण पडले आणि लग्नमंडपी जाण्यापूर्वी वऱ्हाडींना वरबापाच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची वाट धरावी लागली. कैलास शिवराम दामोदर (५०, रा. फर्दापूर, ता. सोयगाव) असे मृताचे नाव असून या दुर्दैवी घटनेने फर्दापूर परिसरात शोकाकुल वातावरण बनले आहे.

फर्दापूर येथे कैलास शिवराम दामोदर यांच्या मुलाचा विवाह जळगाव जिल्ह्यातील वरणगाव फॅक्टरी येथील मुलीशी बुधवारी (दि. २०) दुपारच्या सुमारास फर्दापूर येथे आयोजित केला होता. वऱ्हाडींना लागणारे पाणी भरून ठेवण्यासाठी पुतण्या किरण समाधान दामोदर (३२), भाचा योगेश रमेश बावस्कर (२२) यांच्यासमवेत कैलास दामोदर हे दुचाकीने (एमएच १९ एके ३४८७) पिण्याचे पाणी भरण्यासाठी गावाशेजारील विहिरीवरील मोटारपंप सुरू करण्याकरिता सकाळीच गेले. दरम्यान, मोटारपंप सुरू करून घराकडे परतत असताना त्यांच्या दुचाकीला जळगावकडून येणाऱ्या व बटाट्याने भरलेल्या ट्रकने (एचआर ७३ ए २४४२) समोरून जोराची धडक दिली. अपघातात कैलास दामोदर हे जागीच ठार झाले, तर किरण दामोदर आणि योगेश बावस्कर हे दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना औरंगाबाद-जळगाव मार्गावरील फर्दापूर बस थांब्यानजीक सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. जखमींवर सोयगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून किरण दामोदरला जळगाव येथील रुग्णालयात, तर रमेश बावस्करला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अपघातात किरणचा उजवा पाय निकामी झाला असून डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तसेच रमेश बावस्करचे दोन्ही पाय निकामी झाले असून डोळ्याला जबर मार लागला आहे. अपघातात दुचाकीचा अक्षरक्ष: चुराडा झाला. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून ट्रकचालक फरार आहे.

भारनियमनही उठले जिवावर
बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेपासून भारनियमन असल्यामुळे सकाळीच नवरदेवाच्या वडिलाने वऱ्हाडींकरिता पाण्याची व्यवस्था करण्यासाठी धावपळ केली. त्यामुळे भारनियमनदेखील जिवावर उठले असून वीज वितरणच्या विरोधात या वेळी ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.
हार टाकून उरकला विवाह
लग्न लागण्यापूर्वीच डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवले. त्यामुळे जड अंत:करणाने वधू-वरांनी गळ्यात हार घालून विवाह उरकून घेतला.