आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पित्यावर आली मुलासह सून, नातवावर अंत्यसंस्काराची वेळ; साताऱ्यातील साळवे कुटुंबावर कोसळली संक्रांत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विनोद - Divya Marathi
विनोद
औरंगाबाद - असे म्हणतात की, मुलाचे पार्थिव खांद्यावर नेणे हे कोणत्याही पित्यासाठी सर्वात मोठे दु:खदायी ओझे असते. सातारा येथील शंकरनगरातील रहिवासी श्रीरंग साळवे (६०) यांच्यावर तर आज मुलासह सून, नातवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. शहरात सर्वत्र आनंदाने संक्रांतीचा सण साजरा होत असताना सातारा गावातील शंकरनगर येथील साळवे कुटुंबावर मात्र संक्रांत कोसळली. येथील ३० वर्षांच्या युवकाने पत्नी आणि मुलाचा गळा घोटला आणि स्वत: उस्मानपुरा परिसरात रेल्वे रुळावर जाऊन जीव दिला. शनिवारी दुपारी या तिघांच्याही पार्थिवांना अग्निदाह देण्यात आला. 
 
शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास श्रीरंग साळवे यांची सून आम्रपाली (२४) आणि कुणाल (३) यांचे मृतदेह घरात आढळले, तर मुलगा विनोद बेपत्ता होता. रात्री साडेबाराच्या सुमारास विनोदचा मृतदेह उस्मानपुरा येथे रेल्वे रुळाजवळ आढळला आणि साळवे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. 
 
ते बेशुद्धावस्थेत होते 
शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास श्रीरंग (इलेक्ट्रिक साहित्य विक्रेते) घरी गेले असता त्यांच्या नातवाने त्यांच्यासोबत चहा आणि बिस्किटे खाल्ली. त्या वेळी विनोद आणि त्याची पत्नी दुसऱ्या खोलीत होते. चहा घेऊन कुणाल आईवडिलांकडे गेला. काही वेळाने श्रीरंग नातवाला पाहण्यासाठी मुलाच्या खोलीकडे गेले असता त्यांना दरवाजाची कडी बाहेरून लावलेली दिसली. त्यामुळे त्यांना शंका आली. त्यांनी कडी उघडून पाहिले असता कुणाल आणि त्याची आई झोपलेले दिसले. त्यांना आवाज दिला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. म्हणून त्यांनी जवळ जाऊन त्यांना जागे करण्याचे प्रयत्न केला. तेव्हा ते बेशुद्ध असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले. मात्र, तोपर्यंत दोघांची प्राणज्योत मालवली होती. सातारा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र बागूल यांनी तपास सुरू केला. दरम्यान, शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास उस्मानपुऱ्याजवळ रेल्वे रुळावर एका तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळला. तो विनोदचा असल्याचा संशय आल्याने त्यांनी तत्काळ श्रीरंग यांच्याशी संपर्क साधला. 
 
सतत दुकान बंद असे 
श्रीरंग साळवे यांचे सातारा परिसरात इलेक्ट्रिकलचे दुकान आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी ते रोजगारासाठी शहरात आले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन महिन्यांपासून दुकान अनेक दिवस बंद होते. त्यांच्या डोळ्यांवर महिनाभरापूर्वी शस्त्रक्रिया झाली. त्यांचा लहान भाऊ हा भोळसर असल्याचेही नातेवाइकांनी सांगितले. सातारा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. 
 
संसाराला कंटाळलो 
आत्महत्येपूर्वी विनोदने लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, मी संसाराला कंटाळलो आहे. माझी बायको आम्रपाली मुलगा कुणाल या दोघांना संपवून ती आत्महत्या करत आहे. एका नातेवाइकांना उधार दिलेले हजार रुपये परत घ्या, असे सांगत आय लव्ह यू पप्पा अशा शब्दांनी त्याने चिठ्ठीचा शेवट केला आहे. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार आम्रपाली, कुणालचा गळा घोटून खून झाला आहे. चिठ्ठीतील अक्षर विनोदचेच आहे का, याचा तपास पीएसआय बागूल करत आहेत. 
 
पुण्याहून दोन महिन्यांपूर्वी घरी परतला होता 
श्रीरंग यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, विनोद पुण्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. दोन महिन्यांपूर्वी तो औरंगाबादला परतला होता. तेव्हापासून तो बेरोजगार होता. यावरून त्याचा बायकोशी वाद होत होता. सतत उडणाऱ्या खटक्यांमुळे वैतागला होता.