आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी चोरीच्या फिर्यादीचा मुलगाच निघाला मंगळसूत्र चोर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सिडकोच्या ( एन-4) एमआयटी हॉस्पिटलसमोर मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास मंगळसूत्र चोरीचे विचित्र नाट्य घटले. वर्षा अमोल शिंदे (22) या महिलेचे मंगळसूत्र दोन चोरट्यांनी लांबवले. भामट्यांना चोप देण्याच्या बेतात जमाव असताना दोन्ही चोर दुचाकी सोडून पसार झाले. पुरावा म्हणून दुचाकी ठाण्यात नेली, पण ती चोरीला गेल्याची तक्रार नोंदवण्यासाठी एक गृहस्थ ठाण्यात आले आणि ते चोराचे वडील असल्याचे उघड झाले. सचिन दामोदर साठे असे आरोपीचे नाव आहे.
कामगार चौक आणि जयभवानी चौकाच्या मधोमध असलेल्या एमआयटी हॉस्पिटलसमोर रात्री वर्षा पती अमोल शिंदे यांच्यासोबत जात होत्या. त्या वेळी हीरो होंडा पॅशन (क्रमांक एमएच-20 सीबी-665) या दुचाकीने दोन भामटे आले आणि मागे बसलेल्या चोराने वर्षा यांच्या गळय़ातील सुमारे दोन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले. त्यांची आरडाओरड ऐकून जमाव गोळा झाला. नाकेबंदीसाठी तैनात पोलिस उपनिरीक्षक महेश आंधळे यांच्यासह जमावाने चोरांना पकडले. मात्र बदडून काढणार एवढय़ात संधी साधून दोघेही निसटले. चोरट्याची दुचाकी मुकुंदवाडी ठाण्यात जमा करण्यात आली. थोड्याच वेळाने दामोदर साठे ठाण्यात आले. त्यांनी आपल्या मुलाची गाडी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला, पण गाडी मंगळसूत्र चोरांची असल्यामुळे वडिलांनाही धक्का बसला. त्यानंतर सर्व प्रकाराचा उलगडा झाला.
ठाण्यात आधी वडील आले, नंतर चोर
वडिलांना दुचाकी चोरीला गेल्याची थाप मारून सचिनने पळ काढला. चोरीची तक्रार देण्यास आलेल्या वडिलांना मुलाचा प्रताप कळला. थोड्या वेळाने पोलिसांनी ठाण्यात सचिनला येण्यास भाग पाडले. ठाण्यातील जमावाने ‘त्या’ भामट्याला ओळखले. या वेळी वर्षा शिंदेही होत्या. त्यांच्यासह सर्वांनी एकाच सुरात म्हटले ‘ साहेब हाच तो ! या भामट्यानेच तर मंगळसूत्र चोरले आहे.!’ दुसर्‍या चोराचे नाव संतोष बिरुटे असून त्यालाही अटक केली आहे. मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल झाला.