आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात सामूहिक विवाह सोहळ्याचा चांगला पायंडा: माणिकराव ठाकरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात सामूहिक विवाह सोहळ्याचा चांगला पायंडा पडला आहे. सामूहिक विवाहांमुळे पैशाबरोबरच वेळेचीही मोठी बचत होते. विदर्भात आम्ही अशा प्रकारच्या विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्याचा प्रयत्न करत आहोत. समाजासाठी एक चांगला संदेश याद्वारे जात आहे. त्यामुळे सामूहिक विवाह सोहळा काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले.
 
मुस्लिम समाज नवजीवन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आमखास मैदानावर एप्रिल रोजी (शनिवारी) सामूहिक विवाह सोहळा पार पडला. याप्रसंगी ठाकरे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाबा सिद्दीकी होते. या सोहळ्यात १०१ जोडप्यांचे निकाह लावून देण्यात आले. हाफिज सुल्तान पटेल यांनी कुराणाच्या तिलावतने कार्यक्रमाला सुरुवात केली. मौलाना रशीद मदनी यांनी खुदबाचे पठण केले. या वेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, सामूहिक विवाह सोहळ्यात जे तरुण, तरुणी आपले लग्न लावून घेतात, त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

सर्व समाजांमध्ये अशा प्रकारच्या सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणे आवश्यक असून यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी म्हणाले की, सामूहिक विवाह सोहळ्याचा मंच सर्वधर्मसमभावाचा मंच वाटत आहे. येथे सर्व धर्माच्या नेत्यांची उपस्थिती दिसून येत आहे. युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम म्हणाले की, नोटाबंदीत या कार्यक्रमाची तयारी करण्यात आली, ही खूप कौतुकास्पद आणि अभिमानाची गोष्ट आहे. सामूहिक विवाह सोहळ्यांतून चांगला संदेश समाजात जात आहे. अशा विवाह सोहळ्यांना आपण नेहमीच मदत करत राहू, असेही कदम म्हणाले.
 
या वेळी आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, आमदार इम्तियाज जलिल, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष एम.एम.शेख, माजी आमदार कल्याण काळे, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते डॉ. जफर खान, इंटकचे शहराध्यक्ष शेख, माजी महापौर रशीद मामू, शहर कॉंगेसचे माजी अध्यक्ष इब्राहिम पठाण, सेवादलाचे अध्यक्ष विलास आैताडे, अल्पसंख्याक विभागाचे मराठवाडा अध्यक्ष हमद चाऊस, शहराध्यक्ष खालेद पठाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक युनूस पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
 
वर-वधूंना दिले संसारोपयोगी साहित्य : जिल्ह्यातीलमोठ्या प्रमाणावरील नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. लग्न सोहळ्यात महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. वर-वधूंना सर्व संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. वऱ्हाडींच्या जेवणाची व्यवस्थाही आयोजकांनी केली होती.
 
उपस्थिती हेच आकर्षण
व्यासपीठावर१०१ वरांची उपस्थिती, हे या विवाह सोहळ्याचे आकर्षण ठरले. व्यासपीठावर सर्व पाहुण्यांनी वर-वधूंना आशीर्वाद दिले. सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न लावून घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. अशा सोहळ्यांना दरवर्षी बोलवा, आम्ही आवर्जून येऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...