आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदारांची छायाचित्रे यादीत टाका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लोकसभा, विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. प्रचाराची सारी भिस्त तुमच्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे स्वस्थ बसू नका. घरोघरी जा आणि मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत टाका, अशी सूचना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी (24 जून) पदाधिकार्‍यांना केली. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारा. त्यात अडथळे आणणार्‍यांची नावे वरिष्ठांना कळवा, असेही त्यांनी सांगितले.

आगामी निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेसने राज्यात विभागीय मेळावे सुरू केले आहेत. नागरिकांना मतदार केंद्रापर्यंत खेचून आणण्याची क्षमता असलेल्या पदाधिकार्‍यांना पाठबळ उपलब्ध करून देणे. संपर्कासाठीच्या नव्या तंत्राची ओळख करून देणे आणि या तंत्राच्या वापराकरिता प्रवृत्त करणे, असा या मेळाव्यामागील उद्देश आहे. त्यानुसार आजचा मराठवाडास्तरीय मेळावा आज मौलाना आझाद संशोधन केंद्रात झाला. त्यात ठाकरे म्हणाले की, निवडणुकीच्या प्रचारात अनेक महत्वाचे मुद्दे असले तरी मतदारांना मतदार केंद्रांपर्यंत आणणे अत्यंत महत्वाचे असते. त्यामुळे मतदार याद्या तयार करण्यापासून पदाधिकार्‍यांनी तयारी केली पाहिजे. अनेक ठिकाणी हक्काच्या मतदाराची यादीत नोंदच नाही. त्याचे छायाचित्रच नसल्याचे लक्षात येते. त्यामुळे त्याला मतदानाचा हक्क बजावता येत नाही. यात पक्षाचे मोठे नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन राज्यस्तरावर विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने मतदार यादी अद्ययावत करणे आणि त्याचे छायाचित्र समाविष्ट करणे, यावर भर दिला जाणार आहे. मतदारांचे किमान कुटुंबप्रमुखांचे मोबाइल क्रमांकही पदाधिकार्‍यांकडे असणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने गावतांड्यावर जाऊन माहिती गोळा करावी.

विरोधी पक्षनेते पदाविषयी तक्रार
औरंगाबाद महापालिका विरोधी पक्षनेतेपदी रावसाहेब गायकवाड यांच्या नियुक्तीचे पत्र ठाकरे यांनी चार एप्रिल 2013 रोजी दिले. त्यास अडीच महिने उलटून गेले तरी त्यावर कार्यवाही झालेली नाही. कारण स्थानिक नेतेमंडळी त्यात अडसर निर्माण करत आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या पत्राचा अवमान करण्यापर्यंत त्यांची मजल पोहोचली आहे, अशी तक्रार काँग्रेसच्या एका गटाने ठाकरे यांच्याकडे केली. तेव्हा हे प्रकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आहे. त्यांच्याशी चर्चा करतो, असे उत्तर ठाकरेंनी दिले. यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रकाश मुगदिया, नगरसेवक प्रमोद राठोड यांचीही उपस्थिती होती.

फेसबुक पेजद्वारे राहुल गांधींशी संवाद
देशभरातील ब्लॉक, तालुका, जिल्हा पदाधिकार्‍यांना फेसबुक पेजद्वारे एकत्र केले जाणार आहे आणि या पेजवरून राहुल गांधी प्रत्येकाशी संवाद साधत कामाचा आढावाही घेणार आहेत, अशीही माहिती मेळाव्यात देण्यात आली.

त्याही पुढचे पाऊल टाका
केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. त्या त्यांच्यापर्यंत फक्त माहितीच्या रूपात पोहोचवून उपयोग नाही. तर त्यापुढे पाऊल टाकावे लागणार आहे. योजनेचा लाभ त्या व्यक्तीला मिळाला की नाही. त्यात सरकारी अधिकार्‍यांच्या स्तरावर कोण अडथळे आणत आहे, याचीही माहिती वरिष्ठापर्यंत पोहोचवावी, असेही ठाकरे म्हणाले.