आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनीषा परिहार तरुणीने साकारली खेळण्यांची गणेशमूर्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनीषा परिहारने तयार केलेली खेळण्यांची गणेशमूर्ती. - Divya Marathi
मनीषा परिहारने तयार केलेली खेळण्यांची गणेशमूर्ती.
औरंगाबाद- गणपतीला चौसष्ट कलांचा अधिपती, आदिदेव, बुद्धीची देवता असे संबोधले जाते. अशाचा बुद्धीच्या आणि कल्पकतेच्या माध्यमातून आपल्या आवडत्या लाडक्या बाप्पाची कलाकृती एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने शहरातील मनीषा परिहार या तरुणीने साकारली असून छोट्या मुलांच्या खेळण्यांतून साकारलेल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना ही खेळणी गरीब मुलांमध्ये वाटण्याचा संकल्प केला आहे.
आपल्या घरात गणपतीचे आगमन होणार म्हणून मूर्ती कशी आणायची, सजावट काय करायची याची चर्चा अाधीच सुरू होते. मग आपला गणेशोत्सव आगळावेगळा साकारण्यासाठी वेगवेगळे प्रयोगही केले जातात. अशाच प्रयोगातून चौराहा येथे राहणाऱ्या मनीषा परिहारने छोट्या मुलांच्या खेळण्यांतील बॉल, गाडीचे टायर, बॅडमिंटन, हेलिकॉप्टरचा वापर करून गणपतीची मूर्ती तयार केली आहे. मनीषा म्हणाली की, गणपतीची आराधना करताना आपण इतरांनाही कशी मदत करू शकतो, याचा विचार मी प्रथम करते. गेल्या पाच-सात वर्षांपासून टाकाऊ वस्तू असो वा फळभाज्या, शालेय साहित्य आदींचा वापर करून गणपती तयार करत असल्याचे मनीषा सांगते. या कामात तिचे वडील मूलचंद आणि आई सविता परिहार तिला सहकार्य करतात. आता विसर्जनाच्या दिवशी निर्माल्याची समस्याही मोठी आहे. त्यामुळे पर्यावरणाचा विचार ती करते.
खेळण्यांपासून तयार केलेल्या गणपतीचे विसर्जन गरीब मुलांमध्ये ही खेळणी वाटून करत असल्याचे तिने सांगितले. गणपती तयार करतानाचा किस्सा सांगताना मनीषा म्हणाली, खेळणी घेण्यासाठी वारंवार दुकानात गेले तेव्हा दुकानदाराने मला विचारले, तू इतकी मोठी आहेस, मग तुला एवढी खेळणी कशासाठी हवी? तेव्हा मी गणपती तयार करणार असल्याचे सांगताच दुकानदाराने खेळण्यांचे पैसे घेतले नाहीत आणि म्हणाले, गणपती बाप्पाची मूर्ती सुंदर बनव. सात दिवसांत आकर्षक, सुरेख मूर्ती तयार झाली आहे.

साक्षरतेचाही संदेश...: स्पर्धेतटिकून राहण्यासाठी आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी शिक्षणाची कास धरणे गरजेचे आहे, असा संदेश िदला आहे. या उद्देशाने एबीसीडी, अआई अशा शब्दांनी गळ्यातील माळ तयार करण्यात आली आहे.

अशी तयार झाली मूर्ती
सातमोठे बॉल, सव्वीस छोटे बॉल, पाच छोटे हेलिकॉप्टर, सात छोट्या रिंगचा वापर मूर्ती तयार करण्यासाठी करण्यात आला आहे. सोंड अधिक लांब आणि आकर्षक दिसण्यासाठी स्मायली बॉलचा वापर करण्यात आला असून कान मोठे दिसण्यासाठी खेळातील कासवांचा वापर केला आहे. बदलत्या काळात उत्सवालाही आधुनिकेतेचे रंग येत आहेत. त्यामुळे टेनिस आणि बॅडमिंटनची क्रेझ पाहता गणपतीच्या एका हातात गदा आणि दुसऱ्या हातात बॅडमिंटनचे रॅकेट ठेवले आहे. सुंदरतेला अधिक साज चढवण्यासाठी टायरच्या चकत्यांपासून गणपतीचे केस बनवण्यात आले आहेत.
बच्चेकंपनीला विविध खेळण्यांच्या गणपतीची अनोखी भेट