आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनरेगा’ ठरेल आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा आधार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -  अस्मानी आणि सुलतानी संकटांशी झुंजताना येणाऱ्या नैराश्यातून शेतकरी मृत्यूला कवटाळण्यासारखे पाऊल ते उचलतात. अशाच कारणांमुळे २६ महिन्यांत मराठवाड्यातील २३४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशा प्रकरणांची पडताळणी करून शासन एक लाख रुपये देऊ करत असले तरी त्यातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसमोरील प्रश्न संपत नाहीत. मनरेगासारख्या योजनांचा लाभ दिला तर ही कुटुंबे उभारी घेऊ शकतील, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 
 
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मोठे आहे. कोरडवाहू शेती आणि सिंचनाचा अभाव आदी कारणांमुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. शासन अनेक योजना राबवत असले तरी त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचत नसल्यामुळे ही स्थिती उदभवते. दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने मनरेगावर लक्ष केंद्रित केले आहे.
 
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळाल्यास ही बाब या कुटुंबांना सावरणारी ठरू शकते, असे मत अफामचे अध्यक्ष द्वारकादास लोहिया आणि ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांनी व्यक्त केले. मराठवाड्यातील ६६४३ गावांत मनरेगाची कामे सुरू व्हावीत यासाठी आणि मार्च रोजी गावागावांत विशेष ग्रामसभा घेण्यात आल्या.

 मात्र, त्यांचा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना फारसा लाभ झाला नाही. या कुटुंबीयांना मनरेगातून शेततळी, विहिरींसाठी मदत झाली तर ही योजना या कुटुंबीयांना जगण्यासाठी आधार देणारी ठरेल, असे निरीक्षणही या तज्ज्ञांनी नोंदवले आहे. 
 
वैयक्तिक लाभाच्या योजना अशा : मनरेगांतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत सिंचन विहीर, शेततळी, फळबाग लागवड, वैयक्तिक शौचालय, शेळी-पशू-कुक्कुटपालन शेड, व्हर्मी कंपोस्टिंग आदींचा लाभ घेता येऊ शकतो. सिंचन विहिरीसाठी सुमारे तीन लाखांचे अनुदान मिळते. 
 
डोळसपणे निर्णय घ्यावा 
-बहुतांश आत्महत्याग्रस्त कुटुंबीय कोरडवाहू शेतकरी आहेत. मनरेगाच्या माध्यमातून वैयक्तिक विहिरी, शेततळी इतर लाभ मिळाल्यास या कुटुंबातील सदस्य स्वत:च्या पायावर ठामपणे उभे राहू शकतील. आत्महत्याग्रस्तांचे हात बळकट करण्यासाठी प्रशासनाने डोळसपणे निर्णय घ्यावा. द्वारकादासलोहिया, अध्यक्ष अफाम 

उभारी मिळेल 
-विशेष ग्रामसभा होऊनही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मनरेगाचा फारसा लाभ मिळाल्याचे दिसत नाही. या कुटुंबीयांना वैयक्तिक लाभाच्या योजनांचा आधार मिळाला तर त्यांना जगण्यासाठी उभारी मिळेल. आर्थिक मदतीला एमआरईजीस माध्यमातून जोड दिली तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची स्थिती सुधारू शकते. नरहरी शिवपुरे, सचिव, ग्रामविकास संस्था 
बातम्या आणखी आहेत...