औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उमेदवार मिळेनासा झाला आहे. शेवटी येथील उमेदवाराची प्रतीक्षा राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ या बंगल्यावरून होणार असल्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
राज यांनी राज्यभरातील लोकसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याचे पूर्वीच जाहीर केले आहे. मात्र निवडणूक अवघ्या एका महिना येऊन ठेपली असून औरंगाबादमध्ये अजून पक्षाला सक्षम उमेदवार मिळत नसल्याची राजकीय चर्चा ऐकावयास मिळत आहे. गेल्या 15 वर्षांपासून शिवसेनेचा गड म्हणून ओळखल्या जाणार्या या मतदारसंघात शिवसेनेला धक्का देणे मनसेसाठी प्रतिष्ठेचे झाले आहे. मागच्या निवडणुकीत पक्षाला तसे फारसे यश मिळाले नव्हते.
मागील आठवड्यात राज ठाकरे, पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी मराठवाड्याच्या दौर्यासाठी आले होते. या वेळी आमदार बाळा नांदगावकर आणि संपर्क अध्यक्ष सतीश नारकर यांनी उमेदवारीच्या संदर्भात स्थानिक नेत्यांशी चर्चाही केली. राज यांनी ही विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेतल्या. दौरा संपल्यानंतर दोन दिवसांत उमेदवाराची घोषणा होईलच असा अंदाज कार्यकर्त्यांनी बांधला होता. मात्र अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. पक्षातील स्थानिक नेते आमदारकीची स्वप्ने पाहण्यात रमले आहेत. त्यामुळे खासदारकीचे शिवधनुष्य पेलायला स्वत:हून कोणीही पुढे येत नसल्याचे चित्र आहे. शहरातील ज्येष्ठ पत्रकार किंवा दुसर्या पक्षातील बंडखोरांना तिकीट द्यावे का ही चर्चादेखील सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विधानसभेची तयारी, लोकसभेचे काय ?
महाराष्ट्राच्या सत्तेवर आपला अंकुश हवा या हेतूनेमनसेचे ज्येष्ठ नेते कामाला लागले आहेत. ही लोकसभा निवडणूक आगामी विधानसभेची रंगीत तालीम असणार आहे. या निमित्ताने राज्यभरात पक्षाला मिळणार्या प्रतिसादाचा आढावा घेतला जाणार आहे. या माध्यमातून मनसेची ताकद दिसून येणार आहे. वास्तविक पाहता मराठवाड्यात मनसेचा मास लीडर नसल्यामुळे पंचाईत झाली आहे. दुसर्या यादीत तरी औरंगाबादची उमेदवारी जाहीर होते की नाही याबाबत साशंकता आहे.
लवकरच उमेदवार जाहीर होईल
पक्षश्रेष्ठी उमेदवारासंदर्भात स्थानिक नेत्यांशी चर्चा केली आहे. लवकरच उमेदवार जाहीर होईल. सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकजुटीने कामाला लागले आहेत.
दिलीप बनकर, जिल्हा अध्यक्ष, मनसे